सिंधी, मारवाडी, काटेवाडी, पंजाबी याबरोबरच स्थानिक अशा १० हजार रुपयांपासून १० लाखांपर्यंतच्या किंमती, देखण्या व रुबाबदार घोडय़ांनी अकलूजचा घोडेबाजार फुलून गेला असून घोडे खरेदी व विक्रीसाठी देशभरातील हौशी व्यावसायिक व व्यापारी मोठय़ा संख्येने अकलूजमध्ये दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातील सारंगखेडा, कराड, पंढरपूर, माळेगाव, पाचवड व शिरपूर हे घोडय़ांचे जुने बाजार; परंतु पंढरपुरात त्रास झाल्याच्या कारणावरून या व्यापाऱ्यांनी गेल्या केवळ ४ वर्षांपासून हा बाजार अकलूजला सुरू केला. माजी जि. प. अध्यक्ष व घोडे तज्ज्ञ फत्तेसिंह माने पाटील यांनी या त्रास झालेल्या व्यापाऱ्यांना अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत आश्रय देऊन सुरक्षिततेबरोबरच काही सुविधा दिल्या. त्यातून निर्माण झालेल्या आपलेपणातून देशभरातील हे व्यापारी सारंगखेडय़ाच्या बाजारानंतर घोडे घेऊन थेट अकलूज गाठतात, तेही दसऱ्यालाच. वास्तविक अकलूजचा घोडेबाजार दिवाळी पाडव्यापासून सुरू होतो. या वर्षीही दसऱ्यापासून उद्घाटनापर्यंत जवळपास ६० घोडय़ांच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला आहे.
घोडे खरेदी व विक्रीसाठी आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, रायपूर या भागातून हौशी व व्यापारी आलेले आहेत. अनेक राजकीय नेते मंडळी, संस्थानिक या हौशींबरोबरच वरातीत घोडे नाचवणे, टांगा चालवणे असे व्यावसायिकही छोटे मोठे घोडे व खेचरे घेण्यासाठी आलेले आहेत. गेल्या ३ वर्षांत अकलूजच्या घोडे बाजारात जवळपास ११ कोटीची उलाढाल झाल्याने कृषी उत्पन्न बाजारसमितीनेही आता या व्यापाऱ्यांना सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे.
समितीने चारही बाजूने बंदिस्त असणारी व जाणे येणेसाठी केवळ एकच मार्ग असणारी १० एकराची जागा या बाजारासाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये मोठी सावली असणारी १२०० झाडे असल्याने घोडय़ांना व व्यापाऱ्यांनादेखील सावलीची सोय होते. तसेच बाजारात २४ तास पाण्याची व विजेची सोय करून दिली आहे. प्रत्येक घोडय़ासाठी विजेच्या स्वतंत्र दिव्याची सोय केली आहे. शिवाय सुरक्षा रक्षक तर आहेतच परंतु अडीच महिने चालणाऱ्या या बाजारात फत्तेसिंह माने पाटील रात्रंदिवस ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे या बाजारात गुंडगिरीला कसलाही थारा नाही. या बाजारात रस्त्यांची, घोडय़ांची चाल दाखवण्यासाठी जागेची, शिवाय येणाऱ्या वाहनांची पार्किंगची स्वतंत्र सोय केली आहे. दररोज सायंकाळी डास होऊ नयेत यासाठी बाजारात औषध फवारणी तर केली जातेच शिवाय जनावरांच्या डॉक्टरांचे पथकही २४ तास उपलब्ध असते. भुस्सा, गवत या घोडय़ांच्या अन्नाबरोबरच त्यांचे नाल ठोकणे व साजश्रृंगार विकत मिळण्याचीही या बाजारात सोय आहे. हॉटेल, पानटपऱ्या, किराणा दुकाने थाटली आहेत. या बाजारातील पारदर्शीपणाचे उदाहरण म्हणजे ज्यांना घोडा देणार- घेणार व घोडय़ाचे छायाचित्र असलेली संगणकीय पावती दिली जाते. त्यामुळे अल्पावधीतच हा बाजार तोंडी जाहिरातीने देशभरात प्रसिद्ध झाला आहे. आजही या बाजारात लांबच्या प्रवासासाठी दमदार असणारे सिंध जातीचे, (किंमत सुमारे ३ लाख) पूर्वी राजेमहाराजे वापरणारे मारवाडी जातीचे, (सुमारे साडेपाच लाख) अत्यंत ताकदवान असणारे पंचकल्याणी (सुमारे साडेसात लाख) बलवान व खास हौशीजनांचे आकर्षण असणारे पंजाबी (सुमारे १० लाख) असे घोडे रुबाबात उभे आहेत.    

Story img Loader