शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त येऊन थडकताच सोलापुरातील बाजारपेठा बंद झाल्या. सर्वत्र पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला. बाळासाहेबांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत असताना सर्वत्र शांतता व सुव्यवस्था कायम राहिल्याचे दिसून आले.
बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक असतानाच शहर व जिल्ह्य़ातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबईकडे धाव घेऊन तेथेच तळ ठोकला होता. मात्र शनिवारी दुपारनंतर शिवसेनाप्रमुखांनी जगाचा निरोप घेतल्याचे समजताच शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिक मुंबईला रवाना झाले. नवीपेठ, मेकॅनिक चौक, मुरारजी पेठ, पांजरापोळ चौक, अशोक चौक, पाच्छा पेठ, साखर पेठ, माणिक चौक, मधला मारूती, होटगीरोड, आसरा परिसर, जुळे सोलापूर, विजापूर रोड, सात रस्ता आदी सर्व परिसरात बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद झाल्या. चित्रपटगृहे बंद ठेवली गेली. त्यामुळे त्या परिसरात शुकशुकाट दिसत होता. रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक चालूच होती. मात्र जो तो नागरिक आपापल्या घराकडे धाव घेऊन वृत्तवाहिन्यांपुढे बसणे पसंत करीत होता. सायंकाळी उशिरापर्यंत शहरात कोठेही शांततेला गालबोट लागेल असा अनुचित प्रकार घडला नसल्याचे शहर पोलीस नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. तर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रदीर रासकर यांनी केले.
सोलापुरात बाजारपेठा बंद; शांतता व सुव्यवस्था कायम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त येऊन थडकताच सोलापुरातील बाजारपेठा बंद झाल्या. सर्वत्र पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला.
First published on: 18-11-2012 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market close in solapur