शहरातील सोन्या-चांदीचे व्यापारी शैलेश ठक्कर यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे गुरुवारी उघडकीस आले. ठक्कर यांच्या हत्येचा शहरातील सुवर्णकारांनी सराफा बाजार बंद ठेवून निषेध केला. ठक्कर यांच्या हत्येमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून हत्येचा तपास करावा, अशी मागणी सुवर्णकारांनी केली.
ठक्कर हे पाच दिवसांपूर्वी (९ नोव्हेंबर) सोने घेऊन वैजापूरला गेले होते. ते गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तशी तक्रार दिली होती. बुधवारी रात्री नेवासे पोलिसांना कायगाव टोका येथे आढळून आलेला मृतदेह शैलेश यांचा असल्याचे लक्षात आले. वैजापूर, येवला यांसह विविध ठिकाणी व्यापारासाठी शैलेश ठक्कर प्रवास करीत. गेल्या ९ नोव्हेंबरला ते वैजापूर येथे सोने-चांदी घेऊन गेले होते. नंतर दोन दिवस त्यांचा भ्रमणध्वनी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. अखेर वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुरुवारी रात्री ठक्कर यांच्या नातेवाईकांना नेवासे पोलीस ठाण्यातून एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटविण्यास यावे, असा निरोप आला. हा मृतदेह ठक्कर यांचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठक्करची हत्या झाल्याचे उघडकीस आले.
नगर रस्त्यावरील कायगाव टोका येथे गोदावरी नदीत शैलेश यांचा मृतदेह कमरेला दगड बांधून टाकून दिला होता. एका पोत्यात मृतदेह असल्याचे पोलिसांना आढळून आले. दुपारी घाटी रुग्णालयात ठक्कर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, या हत्या प्रकणातील आरोपींना पोलिसांनी तातडीने पकडावे, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वारेगावकर यांनी ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षकांकडे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा