धुळवडीला पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन विविध संघटना करीत असताना बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात वेगवेगळ्या रंगातील गुलाल आणि रासायनिक रंग आणि विविध आकर्षक पिचकाऱ्या विक्रीला आल्या असून बाजारपेठेतून धुळवडीला कोटय़वधी रुपयाची उलाढाल होणार आहे.  
शहरातील विविध भागात पिचकारी आणि रंगाची दुकाने थाटण्यात आली आहे. धुळवडीच्या आनंदात न्हाऊन निघताना विविध रंगाच्या गुलालामध्ये रंगून निघाले नाही तर उत्सवाचा आनंद कसला? त्यामुळे बाजारात मोठय़ा प्रमाणात विविध रंगामध्ये गुलाल उपलब्ध आहे. हिरवा, निळा, गुलाबी, लाल, भगवा इत्यादी सहा ते सात रंगात बाजारात गुलाल उपलब्ध असून प्रत्येक रंगाची विक्री बाजारातून होत आहे. विदर्भात अमरावती, उमरेड, भंडारा, नागपूरात गुलाल तयार केला जातो. पंचवीस किलो प्रमाणे गुलालाचे पोते बाजारात विक्रीला आहे. पंचवीस किलोच्या पोत्यासाठी चारशे ते पाचशे रुपये मोजावे लागतात. लक्ष्मी, राजापुरी आणि अन्य असे तीन प्रकारचे गुलाल धुळवडीसाठी वापरले जात असून लक्ष्मी गुलालाची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे इतवारीतील गुलाल विक्रेत्यांनी सांगितले. अनेक लोक रासायनिक रंग न वापरता गुलाल उधळून धुळवड साजरी करीत असतात.  
धुळवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक रंगाबद्दल गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणवादी संघटनानी विरोध दर्शविल्यानतरही रंग विक्रेते त्याकडे कानाडोळा करीत मोठय़ा प्रमाणात रासायनिक रंगाची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात गुलालासोबत वॉरनिश आणि इतर कॉसमेटीक रंगाची विक्री करीत आहे. वॉरनिशचा रंग २० रुपयापासून ५० रुपयापर्यंत विक्रीला आहे. या शिवाय लेड ऑक्साईड, चंदेरी अ‍ॅल्यीमिनियम, मक्र्यु सल्फेट, कॅडनियम असे शरीराला घातक असलेले रंग बाजारात उपलब्ध असून बाजारात या रंगाची विक्री जात आहे. यातील अनेक रंगाची किंमत ५० ते ६० रुपयाला ५० ग्रॅमप्रमाणे होत आहे. नैसर्गिक रंगाचा प्रचार आणि प्रसार करून जनजागृती केली जात असली बाजारात मात्र रासायानिक रंगाशिवाय दुसरे कुठलेही रंग बाजारात विक्रीसाठी दिसत नाही. वेगवेगळ्या पानाफुलांपासून किंवा बी बीयाण्यांपासून तयार करण्यात आलेले रंगामुळे त्वचा खराब होत नाही मात्र, हे रंग बाजारात मिळत नसल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली.
रासायनिक रंगांचा वापर घातक
रासायनिक आणि इतर घातक पदार्थापासून तयार करण्यात आलेल्या रंगामुळे अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात त्यामुळे बाजारात आलेल्या रासायानिक रंगापेक्षा आयुर्वेदिक हर्बल किंवा गुलालाचा उपयोग करून धुलिवंदनाचा आनंद घ्या, असे आवाहन वैद्यकीय आणि पर्यावरणवादी संघटनांतर्फे करण्यात आले आहे. काळ्या रंगासाठी वापरण्यात येणारा लेड ऑक्साईड. याचे दुष्परिणाम मूत्रिपड, उत्सर्जन संस्थेवर होऊ शकतात. हिरव्या कॉपर सल्फेटचा परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे डोळे सुजणे, खाज सुटणे किंवा तात्पुरते अंधत्व येऊ शकते. चंदेरी अ‍ॅल्युमिनियम ब्रोमाईडमुळे कर्करोग होण्याची भीती आहे. लाल मक्र्युरी सल्फेटमधील पारा त्वचेतून किंवा श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो. क्रोमियम, कॅडमियममुळे त्वचा अतिसंवेदनशील होणे, ताप, दमा, न्यूमोनिया किंवा अन्य अ‍ॅलर्जी उद्भवू शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रासायनिक आणि कृत्रिम रंग टाळावेत आणि रंगाचा बेरंग होऊ न देता धुळवड साजरी करावी असे आवाहन त्वचारोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत गुप्ता यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्ररोगतज्ञ डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, रासायानिक रंगामुळे १८ टक्के लोकांना इजा होत असतो. कृत्रिम रंगामध्ये काही धोकादायक रंगद्रव्ये व पदार्थ आढळतात जे हानीकारक असतात. वाळू काच पावडर आणि शिसा सारखे पदार्थ डोळ्यास इजा किंवा अंधत्व देऊ शकतात. रंगाचे फुगे सर्वात जास्त धोकादायक असून त्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्त्राव किंवा लेन्स सरकण्याची भीती जास्त असते त्यामुळे रंगाचे फुगे टाळावे. रंगाच्या या उत्सवात डोळ्याची आणि शरीराची काळजी घ्या आणि आपल्या आयुष्यातील रंग उजळू द्या असे आवाहन डॉ. गुप्ता व डॉ. मदान यांनी केले.

Story img Loader