पाच दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी नवी मुंबईतील घाऊक बाजारपेठ सज्ज झाली असून या बाजारपेठेच्या बाहेर असणारी किरकोळ व्यापाराची दुकाने चांगलीच नटली आहेत. काही निवासी गृहसंस्थांनी या काळात घाऊक बाजारातून माल उचलून तो आपल्या रहिवाशांना स्वस्त किंमतीत विकण्याचा प्रयत्न केला आहे.
सणासुदीला तुर्भे येथील घाऊक बाजारपेठेला जत्रेचे स्वरुप आल्याचे चित्र दिसून येते. त्यात दिवाळी म्हणजे या बाजारपेठांसाठी महोत्सव असल्याचे वातावरण निर्माण होत असल्याचा अनुभव आहे. कांदा, बटाटा, लसूण, फळे, भाजी, कडधान्य, धान्य, मसाला या जीवनावश्यक वस्तूच्या या घाऊक बाजारात मागील काही वर्षांपासून दिवाळीत जास्त गर्दी उसळत असल्याचे दृश्य आहे. धान्य बाजारातील रवा, मैदा, बेसन, पोहे, या अन्नधान्याला महागाईच्या या मोसममध्येही चांगली मागणी असल्याचे या विभागाचे उपसचिव रमेश जिरापुरे यांनी सांगितले.
अलीकडे माव्याची मिठाई बनविण्याचे प्रमाण दिवाळीत कमी झाले आहे. मिठाईतून विषबाधेच्या घटना घडू लागल्याने ग्राहकांनी या मिठाईकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेच काही मिठाईवाल्यांनी माव्याचा सहभाग असणारी मिठाई कमी किंमतीत विकण्याचा निर्णय घेतला आहे. मिठाईला पर्याय म्हणून सुक्यामेव्याला प्राधान्य दिले जात असून बदाम, पिस्ता, काजू, याचे भाव आवाक्यात नसतानाही या वस्तुंचा खप चांगला असल्याचे या बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. मिठाई, ड्रायफ्रुटला तिसरा पर्याय म्हणून सध्या फळांची टोपली दिवाळी गिफ्ट देण्याचा ट्रेड वाढू लागला आहे. घरी फराळ बनविण्याचे दिवस आता कमी झाले आहेत. त्यामुळे अनेक बचत गटांनी तयार फराळ बनवून देण्याचा उप्रकम सुरु केला आहे, पण तीनशे ते चारशे रुपये किलो असणारा हा फराळ घेण्यास सर्वसामान्य थोडासा बिचकत असल्याचे दिसून येते.
या बचत गटांनीही घाऊक बाजारात यापूर्वीच हजेरी लावली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. घाऊक बाजारपेठेबरोबरच एपीएमसीने या बाजाराच्या मध्यवर्ती ठिकाणी काही किरकोळ दुकानांना मान्यता दिली आहे. या दुकानात सुईपासून सुशोभिकरण्याच्या सामानापर्यंत सर्व काही मिळत असल्याने या दुकानांना सध्या ग्राहकांनी चारही बाजूने गराडा घातल्याचे दिसून येते. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडीची समस्याही उद्भवू लागली आहे. या दुकानात दिवाळीच्या कंदीलापासून उटण्यापर्यंत तसेच विद्युत रोषणाईचे सामान स्वस्त आणि मस्त मिळत असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल येथील ग्राहकांचा लोंढा सकाळ- संध्याकाळ वळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा