महालक्ष्मीच्या व्रतासाठी पूजाविधीचे काय साहित्य लागते याची तपशीलवार माहिती ‘महालक्ष्मी व्रत माहात्म्य’ या पुस्तकातून मिळते. त्यामुळे मार्गशीर्षांतील पहिल्या गुरुवारची चाहुल लागताच बाजारपेठा फळाफुलांनी भरून जातात. किंबहुना, रोजच्या कामाच्या गडबडीत कोणाला गुरुवार लक्षात नसेल तर बाजारातील विक्रेत्यांची गर्दी बघून लगेच महिलांना महालक्ष्मीच्या व्रताची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, पाच पत्री, पाच फळे, महालक्ष्मीसाठी सुवासिक वेणी, नारळ आणि यानिमित्ताने घरी येणाऱ्या सुवासिनींसाठी गजरे आदी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे बाजार सगळा याच गोष्टींनी भरून गेलेला दिसतो.
वाढती महागाई लक्षात घेता पाच फळांसाठी डझनावारी एकेक फळ घेणे परवडत नाही. त्यामुळे फळविक्रेत्यांनी एक स्वस्त आणि मस्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. एकेक फळ असलेली पाच फळांची पिशवी बाजारात कमीतकमी ५० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. एकेक फळ घ्यायचे तर हे गणित सहजच साडेतीनशे-चारशे रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे शंभर रुपयांपर्यंत पाच फळे घेण्याकडे महिलांचा कल जास्त असतो. त्यामुळे खपही चांगला होतो, असे डोंबिवलीतील फळविक्रेते शंकर नारायण यांनी सांगितले.
फळांबरोबरच आंब्याचे डहाळे आणि पाच फुलझाडांची अथवा पाच फळझाडांची पानेही महत्त्वाची असतात. खरे तर, आंब्याचे डहाळे सहज मिळणे शक्य नसले तरी सकाळच्या वेळी फुले वेचता वेचता पाच पाने सहज उपलब्ध होऊ शकतात. मात्र, आजच्या नोकरदार महिलांकडे तेवढा वेळ नसल्याने या पत्रींची टोपली घेऊन पाच-पाच रुपयांना विकणारी अनेक छोटी-छोटी मुले, बायका बाजारात दिसतात. शेवंतीची सुवासिक वेणी आणि फुलांचे गजरे यांचेही दर सध्या अवाच्या सव्वा आहेत. पूर्वी आम्ही पाच रुपयाला वेणी घेत होतो. आज त्याच वेणीसाठी आम्हाला पंचवीस-तीस रुपये द्यावे लागतात, असे ५० वर्षांच्या चौधरीकाकूंनी सांगितले. एरवी वीस ते तीस रुपयांत चार-पाच गजरे देणारी गजरेवाली आता एका गजऱ्यासाठी दहा ते पंधरा रुपये घेते. याशिवाय, गणपतीत गौरीला नटवण्यासाठी जसे दागिने, कपडे, बांगडय़ा, मुकूट येतात तसेच आता महालक्ष्मीच्या व्रतासाठीही या गोष्टी छोटय़ा छोटय़ा पॅकेटमधून बाजारात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Story img Loader