हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र अशा साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त उद्या, गुरुवारी शहराच्या विविध भागात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांनी नागपूर शहर गजबजणार आहे. विश्व हिंदू परिषदेतर्फे  शहरातील विविध भागात भगवे ध्वजाची विक्री केली जात असून अनेक संघटनांतर्फे चौकाचौकात गुढी उभारली जाणार आहे. विजयाचा संदेश देणारा, अस्मितेस आवाहन करणारा, नवा संकल्प करण्याची प्रेरणा देणारा दिवस असून नागरिकांनी नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत करावे, असे आवाहन विविध संघटनातर्फे करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वस्तू विशेषत: सोने, घर आणि वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठे हाऊसफुल्ल बुकिंग झाले असून यंदाचे बजेट कोटय़वधींच्या घरात पोहोचले आहे.
नागरिकांनी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्ताच्यावेळी घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षांचे स्वागत करता येईल, असे पंचागकर्त्यां विद्या राजंदेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. वर्षांरंभाच्या या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून गुढी उभारावी आणि त्याचे पूजन करावे. कुळाचाराप्रमाणे प्रभूरामचंद्राचे आणि देवीचे नवरात्राला उद्यापासून प्रारंभ होत आहे. पंचांगामधील वर्षफलाचे श्रवण करावे म्हणजे त्या योगे नवीन वर्ष शुभफलदायक होते. संपूर्ण वर्ष आरोग्यमय जाण्यासाठी अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडूनिंबांची पाने सर्वानी खावी, असेही विद्या राजंदेकर यांनी सांगितले.

Story img Loader