लोकसभा निवडणुकीची सगळीकडे धामधूम सुरू आहे. या रागरंगमध्ये रंगपंचमी पाच दिवसांवर येऊन ठेपली असून बुरा न मानो होली है .. म्हणत सप्तरंगात न्हाऊन निघायला आणि इतरांनाही न्हाऊ घालायला सज्ज झाले आहे. सध्या दहावी, बारावी आणि शाळांमध्ये परीक्षेचे दिवस असले तरी धुलीवंदनाच्या दिवशी मात्र हमखास आबालवृद्ध रंगाचा आनंद घेत असतात. घरोघरी लहान मुले रंगपंचमीची तयारी करीत असताना दुसरीकडे रंग आणि स्टाईलश पिचकाऱ्यांचा बाजारही ऐन रंगात आला आहे. यावेळी धुलीवंदनावर लोकसभा निवडणुकीचे सावट असून अनेक पिचकाऱ्या आणि इतर साहित्यावर विविध राजकीय पक्षाच्या चिन्हाची छाप आहे. यावेळी कमळ, हत्ती, पंजा या प्रमुख राजकीय पक्षांची  चिन्हे असलेल्या आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध असून त्याला मागणी चांगली आहे. धुलीवंदनाच्या दिवसात २० ते २५ कोटींची बाजारात उलाढाल होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी
दिली.
 इतवारी, महाल, सक्करदरा, गोकुळपेठ, सीताबर्डीवरील बाजारपेठा रंग, पिचकाऱ्या टपऱ्या स्टॉल्सने गजबजून गेल्या आहेत. यंदाही गुलालासह रोडामेन, गोल्डन आणि सिल्व्हर या रंगाना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. यावर्षी चायनीज पिचकाऱ्यांचा बोलबाला आहे. पाच दिवसांवर धुलीवंदन असले तरी शहरात अजून माहोल दिसून येत नाही. बाजारात रंग आणि पिचकाऱ्यांनी बाजारपेठा सजून तयार असून दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसले आहेत. रंग आणि पिचकाऱ्यांची ठोक विक्री पंधरा दिवसापूर्वी सुरू झाली असली किरकोळ विक्रीला मात्र फारसा प्रतिसाद दिसून
येत नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. बाजारात चायना गन्स, टँकर्स, सू सू बॉय, हातोडी पंप, स्प्रे पंप, दिल पंप, आदी नावाच्या पिचकाऱ्या विक्रीला आहेत. लोकसभा निवडणुका असल्यामुळे विविध राजकीय पक्षांची चिन्हे असलेल्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहे. रंगाच्या डब्यांवर नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे छायाचित्रे आहेत. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचे मुखवटे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनेक अभिनेत्यांची छायाचित्रे असलेल्या पिचकाऱ्या बाजारात आल्या असून त्याला बाजारात ठोक विक्रेत्यांकडून चांगली मागणी आहे. विविध फळे बंदुका, मनी बँक, क्रिकेटच्या बॅटची प्रतिकृती असलेल्या पिचकाऱ्या बाजारात दिसत आहेत.
इतवारीतील रसिक स्टोअर्सचे मालक शैलेश जयस्वाल यांनी सांगितले, गुलाल, पाण्याचे रंग, डबीतील द्रवरूप रंग, रोडोमेन, गोल्डन, स्टार्च रंग यांची खरेदी गेल्यावर्षी चांगली झाली. यावषीर्ही या रंगांना चांगली मागणी आहे. जर्मनीचे रंग बाजारात आले आहेत. सात वेगवेगळ्या अत्तराच्या फ्लेव्हरमध्ये जर्मनीचे रंग ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांप्रमाणे यावेळी गुलाल, गोल्डन, सिल्व्हर, रोडामेन, खडीचे रंग, या रंगाना जास्त मागणी असून त्याचे दर प्रती किलो ४५  रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहे. पिचकाऱ्यांमध्ये चायनीज पिचकाऱ्यांचा बोलबाला असून मिकी माऊसचे चित्र असलेली ऑक्सिजन टँक पिचकारी ही बच्चेकंपनीची खास आकर्षण ठरली आहे. या शिवाय पारंपरिक पद्धतीच्या निरनिराळ्या पिचकाऱ्याही बाजारात उपलब्ध आहेत. मशीन गन असलेली पिचकारी सर्वात महाग असून त्यात एक ते दीड लिटर रंग भरला जातो. दिल्ली, कोलकाता, लखनौ आणि मुंबई या ठिकाणाहून पिचकाऱ्या आणल्या जातात. होळीच्या दोन दिवस आधी रंग आणि पिचकाऱ्यांची विक्री होईल, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला.

Story img Loader