आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, जागतिक पटलावर नाशिकचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पाच कोटी निधी अपेक्षित आहे. या माध्यमातून राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देऊन त्यांची नियोजनबद्ध प्रसिद्धी करून पर्यटकांना आकर्षित केले जाणार आहे. या कामी पर्यटन विषयाचे शिक्षण घेणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. एकुणात महामंडळाने सिंहस्थानिमित्त राज्यातील पर्यटनस्थळांचे ‘मार्केर्टिंग’ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नियोजनास सुरुवात केली आहे. १२ वर्षांतून एकदा येणाऱ्या या पर्वणीचे औचित्य साधून राज्यातील सर्व प्रेक्षणिय स्थळांचे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ‘मार्केटिंग’ करण्याकडे महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. त्याकरिता राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिद्धी करणे, त्याबाबतची माहिती देणे, रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देताना राज्याची लोकसंस्कृती, साहित्य, कला यांचा परिचय येथे येणाऱ्या पर्यटकांना व्हावा, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांना देण्याकरिता तीन लाख रुपयांची माहितीपत्रके, प्रसिद्धी पत्रकांच्या छपाईचे नियोजन आहे. कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व, एमटीडीसीच्या योजना, राज्यात विविध ठिकाणी असलेली रिसॉर्ट्सची यादी आदींचा त्यात अंतर्भाव केला जाईल. तसेच राज्यातील विविध प्रेक्षणिय स्थळे या अंतर्गत अंजिठा, एलिफंटा, एलोरा येथील लेण्या, देवगिरी येथील दौलताबाद, रायगड, पन्हाळा, विजयदुर्ग यांसारखे ऐतिहासिक किल्ले, भाविकांची श्रद्धास्थाने असणारी शिर्डी, घृष्णेश्वर, अष्टविनायक, कोल्हापूरची महालक्ष्मी यांच्यासह थंड हवेची ठिकाणे व समुद्रकिनारे याबाबत माहिती देण्यात येणार आहे. या कालावधीत शहराच्या चारही प्रवेशद्वारांसह नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात वर्षभरासाठी १५ ते २० होर्डिग्ज भाडेतत्त्वावर घेण्याचा मानस आहे. यासाठी साधारणत: साडे तीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
राज्यातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती देण्यासाठी मुद्रित व इलेक्ट्रॉनिक या दोन्ही माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. त्यांची सीडी तयार करून नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर येथील महत्त्वाची ठिकाणे येथे पर्यटकांना चित्रफिती दाखविल्या जाणार आहेत. यासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शहराला लाभलेले धार्मिक, ऐतिहासिक, औद्योगिक आणि शैक्षणिक आयाम पाहता नाशिकची वेगळी ओळख पर्यटकांना करून देण्याकरिता एमटीडीसी प्रयत्नशील राहील. प्रसिद्धी व माहिती देण्यात कुठेही मागे पडू नये याकरिता पर्यटन विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर प्रशिक्षण, त्यांना माहिती केंद्रावर काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच काही विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक करणे, त्यांचे मानधन व इतर खर्चासाठी महामंडळाला एक कोटी रुपयांचा निधी हवा आहे. दरम्यान, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची कुठल्याही प्रकारची दिशाभूल होऊ नये या हेतूने नाशिक व त्र्यंबकेश्वर या परिसरात नाशिक रोड रेल्वेस्थानक, शहरातील विविध बस स्थानके, पंचवटी परिसर आदी महत्त्वाच्या ठिकाणी माहिती केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या माहिती केंद्राद्वारे पर्यटकांना कुठे कसे जाता येईल, राहण्याची व भोजनाची व्यवस्था कशी होऊ शकेल, नाशिकमध्ये कुठे भेटी देता येतील, याबद्दल माहिती देण्याचे नियोजन आहे. याकरिता आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री पाहता या उपक्रमास एक कोटी रुपयांचा निधी महामंडळास हवा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा