धूळवडीला रंग आणि पिचकाऱ्यांचे जसे महत्त्व आहे तितकेच गाठय़ांचे आहे. विशेषत: होळी आणि गुढीपाडवा या सणांच्या दिवशी हमखास गाठय़ांची खरेदी केली जाते. शिवाय उन्हाळ्याची चाहुल लागली की लगेच गाठय़ांची आठवण होते. होळीच्या पंधरा दिवस आधी बाजारात गाठय़ा विक्रीसाठी येत असून जवळपास तीन महिने गाठय़ांचे वास्तव्य बाजारपेठेत असल्यामुळे या दिवसात कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते.
यावर्षीसुद्धा मोठय़ा प्रमाणावर गाठय़ा बाजारात विक्रीला आल्या असून गुढीपाडवापर्यंत गाठय़ांची विक्री केली जाते. भोई लोकांचा परंपरागत असलेल्या गाठय़ाचा व्यवसाय आता इतरानींही स्वीकारला आहे. बाजारपेठेत ६० ते ८० रुपये किलो प्रमाणे गाठी विक्रीला आहेत. शहरात इतवारीसह शहरातील विविध भागात गाठय़ा तयार करण्याचे कारखाने असून त्या ठिकाणी चार ते पाच महिन्यांपासून गाठय़ा तयार करण्याचे काम सुरू आहे. गाठय़ा तयार करण्याच्या साच्यात साखरेचा पाक ओतून तीन ते चार तास ठेवतात. नंतर साचे उघडले की वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षक अशा गाठय़ा तयार होत असतात. पूर्वी काही ठराविक गाठय़ा तयार करण्याची ठराविक साचे होते. मात्र, आता गाठय़ांचे साचे बदलले आहेत.
आधुनिक साच्यामध्ये लवकर आणि अधिकाधिक गाठय़ा तयार होत असतात. साखरेच्या पाकापासून तयार केल्या जाणाऱ्या गाठय़ांची किंमत साखरेच्या किमतीवर अवलंबून असते. साखरेची किंमत कमी असेल तर गाठय़ाची किंमत सुद्धा कमी असते. साखर महाग झाल्यामुळे गाठय़ांच्या किमती वाढल्या आहेत. साधारणपणे शंभर किलो साखरेत १२५ किलो वजनाच्या गाठय़ा तयार होत असतात. एका गाठीत दहा ते बारा पदके असतात. एका किलोमध्ये कधी पाच सहा गाठय़ा तर कधी एकच गाठी बसते, २५ किलोची एक गाठी बाजारात विक्रीसाठी आहे.
पांढऱ्या गाठीच्या पदकावर रंगीत फुले, तसेच वेगवेगळी पारंपरिक पद्धतीने रंगरंगोटी केली जाते. त्यामुळे सहाजिकच या गाठय़ांची किंमत अधिक असली तरी अशा रंगीत गाठय़ांच्या खरेदीकडे लोकांचा अधिक कल असतो. इतवारीतील लोहा ओळीमध्ये तयार होणाऱ्या गाठय़ा विदर्भात विविध ठिकाणी जात असतात. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगढ या राज्यात मोठय़ा प्रमाणात गाठी तयार करण्याचे कारखाने असून त्या ठिकाणाहून मोठय़ा प्रमाणात गाठय़ाची आवक होते. शहरात इतवारी, महाल, गोकुळपेठ, सीताबर्डी, सक्करदरा आदी बाजारपेठेमध्ये गाठय़ांची विक्री केली जात. रंगपंचमीच्या दिवशी घरोघरी लहान मुलांना गाठय़ा देत असतात. शिवाय होळीनंतर बारा दिवसांनी गुढीपाडवा असल्यामुळे या दिवशी गुढीला गाठी लावली जाते. उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना गाठी खाऊन निघाले की उन्ह लागत नाही, असे घरची वडीलधारी मंडळी सांगतात. त्यामुळे कैरीचे पन्हे तयार करताना साखरेऐवजी गाठीचा उपयोग करण्यात येतो.

Story img Loader