नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये आता दिवाळीचा रंग चढू लागला असून दिवाळीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. निरनिराळ्या रंगांच्या पणत्या, रांगोळ्या, आकाशकंदील, फटाके, सुगंधी उटणे आणि फराळाचे पदार्थ खरेदीसाठी उपलब्ध असून ग्राहकांची बाजारपेठेत गजबज रेलचेल होण्यास सुरुवात  झाली आहे.
पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर चिनी मातीच्या पणत्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात दाखल झाल्या असून चिनी मातीच्या पणत्यांऐवजी पारंपरिक पणत्या घेण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. एपीएमसीच्या बाजारात मातीच्या पणत्या २० ते ३० रुपये डझन तर चिनी मातीच्या पणत्या ४० ते ६० रुपये डझन आहेत. याशिवाय सुगंधी आणि डेकोरेटिव्ह पणत्याही बाजारात उपलब्ध असून २० रुपयाला दोन या दरात उपलब्ध आहेत.
आकर्षक कंदील
बाजारात पारंपरिक आकाशकंदिलाबरोबर चायना मेड आकाशकंदील विक्रीसाठी आले आहेत. मात्र देशी बनावटीचे आकर्षक कंदील घेण्याकडेच लोकांचा कल असल्याचे दिसून येत आहे.  प्लास्टिकचे साधे कंदील ५० रुपयांपासून तर चायना कंदील १५० रुपयांपासून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. फिरकी, चांदणी, झालर आदी प्रकारांमध्ये कंदील पाहायला मिळत आहेत.
रेडिमेड किल्ले
वेगवेगळ्या आकाराचे आकर्षक रंगसंगतीचे प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेले किल्ले बाजारात दाखल झाले असून ३०० ते ८०० रुपयांपर्यंत या रेडिमेड किल्ल्यांची विक्री केली जाते. रेडिमेड किल्ल्यांबरोबरच शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या आकर्षक मूर्तीही बाजारात उपलब्ध आहेत.
रेडिमेड रांगोळ्याही
धकाधकीच्या जीवनात रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळत नसल्याने कामकाज करणाऱ्या गृहिणींची मागणी लक्षात घेऊन रेडिमेड रांगोळ्याही बाजारात दाखल झाल्या आहेत. रंगीबेरंगी खडय़ांचा आणि मण्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या रांगोळ्या अल्पावधीतच लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक रांगोळ्यांची मागणी फारशी कमी झाली नसली तरी गृहिणींकडून रेडिमेड रांगोळ्यांनासुद्धा पसंती दिली जात आहे. दीडशे रुपयांपासून या रांगोळ्या उपलब्ध आहेत.
ड्रायफूट्रनी बाजारपेठ सजली
दिवाळीत ड्रायफूट्र, कॅडबरीज आदी वस्तू भेट स्वरूपात दिल्या जातात. मिक्स मिठाई, ड्रायफूट्र, कॅडबरीज यांना मागणी असल्याने बहुतांशी व्यावसायिकांनी ३०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंतचे विविध आकारांचे बॉक्स तयार केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा