विद्यार्थ्यांचे गुण बदलल्याचे प्रकरण
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे गुण बदलल्याच्या गैरप्रकारात पोलीसतपासात अधिक माहिती पुढे तपास केला असून, गुण बदलण्याचा प्रकार पुनर्मूल्यांकनाच्या वेळी गुणांची संगणकावर नोंद करताना (डेटा एंट्री) झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या गैरप्रकारात प्रश्नपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांनाही ही बाब माहीत असावी, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गुन्हा दाखल केलेल्या कर्मचाऱ्यांचा अद्याप शोध सुरू असून त्यांना अटक केल्यानंतर यामध्ये अधिक माहिती समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पूना कॉलेजमधील डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट उघड झाल्यावर या प्रकरणात विद्यापीठाच्या गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकन विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण वाढवून दिले जात असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विद्यापीठातर्फे माजी पोलीस अधिकारी शरद अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने दोन महिन्यांनंतर आपला अहवाल विद्यापीठाकडे सादर केला होता. या प्रकरणात हे तीन कर्मचारी दोषी आढळून आल्यानंतर त्यांना तीन दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. अशोक शंकरराव रानवडे, रमेश किसन शेलार (रा. विद्यापीठ कॉर्टर्स ) आणि चेतन गजानन परभाणे या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात फरार असलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी तपास केल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण हे संगणकावर नोंद करताना बदलले गेल्याचे समोर आले आहे. मात्र, हे गुण बदलले असल्याची माहिती त्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांना असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुण वाढवण्याचे काम कशा पद्धतीने करत होते. त्यासाठी त्यांना पैसे कसे व कोणत्या माध्यमातून मिळत होते, याचा शोध सुरू आहे. या तिघांना अटक केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.