महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्हा मूल्यमापन समिती जेव्हा प्रत्येक गावाचे मूल्यमापनाचे काम हाती घेते, तेव्हा गुणदानही कसे करावे, याची पद्धती शासनाने निश्चित करून दिली आहे. मूल्यमापनाचा हा खरेतर दुसरा टप्पा असतो. म्हणजे, प्रत्येक गाव प्रथम स्वयंमूल्यमापन करत असते. त्यानंतरचा हा टप्पा तसा महत्वपूर्ण ठरतो. कारण, यावेळी प्रत्येक गावाच्या कामगिरीचे सुक्ष्म पातळीवर पडताळणी होऊन गुण दिले जातात. त्यानंतरचा टप्पा असतो तो, जिल्हा बाह्य मूल्यमापन समितीचा.
दाखल व नव्याने निर्माण झालेले तंटे यापैकी मिटविलेल्या तंटय़ांच्या बाबतीत विहित निकष विचारात घेऊन जिल्हा मूल्यमापन समिती एकमताने गुणदान करते. मिटविलेल्या तंटय़ांची टक्केवारी अपूर्णाकात आल्यास ती त्यापुढील पुर्णाकामध्ये परिगणीत करण्यात येते. म्हणजे ८५.१८ असे गुण असल्यास ते ८६ असे मानले जातात. तंटामुक्त गाव समितीने त्यांच्या स्वयंमूल्यमापन अहवालात दर्शविलेल्या आकडेवारीत जिल्हा मूल्यमापन समितीला मूल्यमापनाच्यावेळी चार प्रकारातील तंटय़ांची एकूण संख्या आणि मिटविलेल्या तंटय़ांची संख्या यामध्ये तपासणीअंती फरक दिसून आल्यास जिल्हा मूल्यमापन समिती तपासणीत त्या त्या तंटय़ांच्या प्रकारासाठी दिसून आलेल्या तंटय़ांच्या अंतिम आकडेवारीनुसार मिटविलेल्या तंटय़ांची टक्केवारी काढते आणि त्या टक्केवारीच्या आधारे गुणदान करून गाव तंटामुक्त झाले किंवा कसे याविषयी निर्णय घेतला जातो.
तंटय़ांच्या एका किंवा एकापेक्षा अधिक प्रकारात काही गावांमध्ये दाखल किंवा नवीन निर्माण झालेला एकही तंटा प्रलंबित नाही, अशी स्थिती दिसून आल्यास ही कार्यवाही तंटामुक्त गाव समितीने काटेकोरपणे केली आहे काय, याची खात्री मूल्यमापन समिती करते. मूल्यमापन समितीच्या खात्रीनंतर एखाद्या प्रकारात एकही तंटा गावामध्ये ३० सप्टेंबरपूर्वी प्रलंबित नसेल किंवा त्यानंतर नवीन तंटा निर्माण झालेला नसेल तर त्या तंटय़ांच्या प्रकारासाठीचे किमान गुण दिले जातात. अशा गावांमध्ये तंटामुक्त गाव समितीने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर तपासणी करून त्यानुसार गुण दिले जातात.
   
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील चाळीसावा लेख.
डाकीण प्रश्नावर रचनात्मक भूमिका
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या कामकाजावर प्रकाशझोत टाकताना ‘लोकसत्ता – नाशिक वृत्तान्त’मधून नंदुरबार जिल्ह्यातील डाकीण प्रश्नाकडेही लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे सातपुडा पर्वतराजीतील गंभीर प्रश्न आणि त्यावर उत्तर शोधणाऱ्यांची धडपड प्रथमच सविस्तरपणे समाजासमोर मांडली गेली. डाकीण प्रश्नावर घेतलेल्या रचनात्मक भूमिकेचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्यावतीने स्वागत करतो. गेली शेकडो वर्ष आदिवासी बांधवांच्या मनात घर केलेली ही अंधश्रद्धा घालविण्यासाठी विविध पातळीवरून सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. सामाजिक संस्था, चळवळी, पोलीस प्रशासन, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि प्रसारमाध्यमे या सर्वानी आपापल्या पातळीवर सकारात्मक, पूर्वग्रहरहीत भूमिका घेऊन कृतिशील राहण्याची गरज आहे. ‘नाशिक वृत्तान्त’मधील लेखमालेतून ही बाब अधोरेखीत झाली.
विनायक सावळे, राज्य कार्यवाह,महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा