*  पुणे विद्यापीठाचा अजब कारभार
*  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
पुणे विद्यापीठाच्या कारभारातील सावळागोंधळ दिवसागणिक वाढत असून अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षांच्या निकालात पुन्हा त्याचे प्रत्यंतर आले आहे. संगणकशास्त्र शाखेचे शिक्षण देणाऱ्या क. का. वाघ महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकात ज्या विषयाचा पेपरच त्यांनी दिला नाही, त्याचे गुण देऊन अनुत्तीर्ण करण्याची करामत विद्यापीठाने केली. महत्त्वाची बाब म्हणजे, पुढील परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात येत असताना गुणपत्रकात दुरुस्ती करण्याची तसदी विद्यापीठाने न घेतल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.
पुणे विद्यापीठाचे निकाल दरवर्षी वेगवेगळ्या घोळामुळे गाजत असतात. यंदा त्यात अभियांत्रिकी शाखेच्या गोंधळाची भर पडली आहे. क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या निकालात विद्यापीठाने हा गोंधळ घातला. या विद्यार्थ्यांनी ‘आर्टिफिशिअल इन्टिलिजन्स’ आणि सॉफ्टवेअर ‘टेस्टिंग’ या दोन विषयांचे पेपर दिले होते. परंतु, विद्यापीठाने निकाल जाहीर करताना संबंधितांना उपरोक्त दोन विषयांऐवजी ‘इमेज प्रोसेसिंग’ व ‘मल्टिमीडिया सिस्टीम’ या दोन विषयांसाठी गुण दिले. म्हणजे ज्या विषयांचे पेपर या विद्यार्थ्यांनी दिले नाही, त्या विषयांचे गुण विद्यापीठाने बहाल केले. त्यात ‘इमेज प्रोसेसिंग’ विषयात विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आले. तोंडी व लेखी अशा दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण दाखविण्यात आले. हे गुणपत्रक हाती पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व्यवस्थापन आणि पुणे विद्यापीठाकडे संकेतस्थळावर तक्रार नोंदविली. परंतु, आजतागायत त्यांना उत्तर मिळालेले नाही. सोमवारी या विद्यार्थ्यांनी मनविसेचे अजिंक्य गीते यांच्याशी संपर्क साधून हा घटनाक्रम कथन केला. गीते यांनी पुणे विद्यापीठातील अनेक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा घोळ निस्तरण्याची मागणी केली.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढील परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा मंगळवार हा अंतिम दिवस आहे. या विद्यार्थ्यांनी ज्या विषयाचा पेपर दिला, त्यात उत्तीर्ण आहोत की अनुत्तीर्ण हे अद्याप त्यांना ज्ञात नाही. गुणपत्रिकेतील दुरुस्ती अद्याप विद्यापीठाने केली नाही. यामुळे त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची चिन्हे असून विद्यापीठाने त्यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी गीते यांनी विद्यापीठाकडे केली
आहे.

Story img Loader