लग्नाचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार देणाऱ्या शिक्षकाविरोधात वाशी पोलिसांनी बलात्काराचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या तरुणीला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्षकाच्या घरच्या पाच सदस्यांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकासह त्यांच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
सांगली येथील शिराळा तालुक्यात राहणाऱ्या या तरुणीचे त्याच जिल्हय़ातील बेजेगावातील शिक्षक सुमित पाठणकर या तरुणाशी सन २०१२ पासून प्रेमसंबंध जुळले होते. या वेळी सुमितने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर पुढील शिक्षणासाठी नवी मुंबईत पीडित तरुणी आली होती. दरम्यान, कोपरखैरण्यातील एका कॉलेजमध्ये सुमितही नोकरीनिमित्ताने नवी मुंबईत आल्याने त्यांच्यातील जवळीक अधिक वाढली होती.
काही दिवसांपूर्वी सुमित याने तिला पुणे येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी नेले होते. मात्र सुमितच्या आई-वडिलांनी या लग्नास नकार दिला. त्या वेळी सुमित याचे वडील, काका, आई, बहीण आणि बहिणीच्या पतीने जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली होती. पोलीस कर्मचारी असलेल्या पीडित तरुणीच्या वडिलांनी सुमित याच्या घरच्यांची भेट घेत दोघांचे लग्न लावून देण्याची विनंती केली होती. मात्र तरीही सुमित याच्या घरचे नकारावर ठाम होते. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी घर सोडून गेली होती. अखेर पोलिसांनी शोध घेत सातारा येथून तिला सुखरूप परत आणल्याची माहिती. वाशी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे यांनी दिली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सुमित याच्या विरोधात बलात्कार, फसवणूक तर त्याचे वडील रत्नकांत पाठणकर, आई, काका, बहीण स्मिता शिंदे आणि स्मिता हिचे पती यांच्या विरोधात जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात सुमित आणि त्याचे वडील यांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा