सांगोला तालुक्यातील चोपडी येथे एका विवाहित महिलेचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. मारेकऱ्याने खून केल्यानंतर कुऱ्हाड मृत महिलेच्या मानेवरच ठेवल्याचे दिसून आले. मात्र हा खून कोणी व कशासाठी केला, याचा उलगडा झाला नाही. यासंदर्भात सांगोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नकुसा सुरेश बंडगर (वय ३५) असे खून झालेल्या दुर्दैवी विवाहित महिलेचे नाव आहे. मृत नकुसा ही सायंकाळी सरपण आणण्यासाठी नजीकच्या शेतात गेली होती. तर तिचा पती सुरेश बंडगर हा ग्रामपंचायतीचे पाणी सोडण्यासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत नकुसा ही घरी परतली नाही म्हणून तिचा शोध घेण्यात आला. तेव्हा नजीकच्या शेतात नकुसा ही रक्ताच्या थारोळय़ात मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. तिच्या मानेवर कुऱ्हाडीने वार झाले असून मारेकऱ्याने नकुसा हिच्या मानेवर कुऱ्हाड तशीच टाकून पलायन केल्याचे आढळून आले. तिचा खून कोणी व कशासाठी केला, याचा शोध सांगोला पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रकाश सातपुते हे घेत आहेत.
फिर्यादीच आरोपी निघाला..
आपले इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे दुकान फोडून चोरटय़ांनी तीन लाख २० हजार रुपये किमतीचे ८ लॅपटॉप लंपास केल्याची फिर्याद देणारा दुकानमालकच या गुन्हय़ात आरोपी म्हणून तपासात निष्पन्न झाला. सांगोला तालुक्यातील नाझरे येथे स्नेहजित पोतदार (रा. आटपाडी, जि. सांगली) यांचे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे दुकान आहे. या दुकानाचे कुलूप उचकटून चोरटय़ांनी ८ लॅपटॉप चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी सांगोला पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पोलिसांनी या गुन्हय़ाचा तपास हाती घेतला असता नाझरेसारख्या छोटय़ाशा गावात दुकानात आठ लॅपटॉप विक्रीसाठी उपलब्ध कसे असतील, याबद्दल पोलिसांना संशय आला. त्यादृष्टीने तपास केला असता कर्जबाजारीपणामुळे पोतदार यानेच चोरीचे हे खोटे नाटक रचल्याचे दिसून आले. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर थोडय़ाच दिवसांत तो संबंधित विमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा करणार होता. परंतु पोलिसांनी तपासात सत्य उजेडात आणल्यामुळे पोतदार याचे बिंग फुटले आणि तो फिर्यादी न राहता आरोपी बनला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा