पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) प्रांगणात दरवर्षी देशभरातील शाळांसाठी भरविण्यात येणाऱ्या ‘रोबोट्रीक्स’ या रोबोटीक स्पर्धेचा यंदाचा आशय विषय ‘मंगळावरील मोहीम’ असा आहे. १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या होणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने ‘आयआयटी’च्या प्रागणांत मंगळावरील सृष्टीच जणू अवतरणार आहे.
स्पर्धेचे यंदाचे हे पाचवे वर्ष असून देशभरातील सुमारे ६०० शाळा यात सहभागी होतील. ‘थिंकलॅब्ज टेक्नॉसॉल्युशन’ या संस्थेतर्फे ही स्पर्धा आयोजिण्यात येते. ‘आयआयटी’च्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापलेली ही संस्था विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिती शिक्षणासंबंधात काम करते.
मंगळावर सजीव सृष्टी आढळून आल्याने पृथ्वीवरील लोकसंख्या वाढीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने मंगळावरील रहिवासाच्या कपोलकल्पित गोष्टी रंगवल्या जात आहेत. याच गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाशक्ती लढवावी आणि तांत्रिक उपकरणांच्या आधारे ती प्रत्यक्षात आणावी, हे या स्पर्धेचे उद्दिष्ट असणार आहे.
रोबोटीक स्पर्धा या आतापर्यंत महाविद्यालयीन स्तरावर होत होत्या. पण, शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या या उपक्रमाला असलेला प्रतिसाद गेल्या पाच वर्षांत खूपच वाढला आहे, असे ‘थिंकलॅब’चे संस्थापक गगन गोयल यांनी सांगितले.
‘रोबोट्रीक्स’मध्ये कुठल्याही शाळेतील विद्यार्थ्यांला वा शाळेच्या चमूला सहभागी होता येते. मंगळाविषयीचे अधिक जाणून घेण्याच्या दृष्टीने तेथील वातावरण, मातीची किंवा जमिनीची प्रत आदी सृष्टीविषयक बाबींबरोबरच भविष्यातील मंगळावरील मोहीमा आदी विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. यात रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने मंगळाचा शोध घेणारी, रस्त्यात येणाऱ्या अडचणींवर मात करणारी उपकरणे पाहता येतील. या उपकरणांमध्ये मंगळावरील वातावरणात काम करण्याची क्षमता आहे का हे तपासले जाईल. मुलांनी तयार केलेला रोबो किंवा उपकरण सक्षम आहे की नाही हे तपासण्याबरोबरच त्याचे सादरीकरण, टीमवर्क देखील पारितोषिकासाठी निवड करताना पाहिले जाईल. प्रत्येक गटासाठी दोन लाख रूपये इतकी भरघोस बक्षीसे या सर्धेत ठेवण्यात आली आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा