संपूर्ण जगाच्या इतिहासात हुतात्म्यांचे बलिदान कधीही वाया जात नसते, तर त्यांच्यापासून नवतरूणांना स्फूर्ती मिळत गेली आहे. सोलापूर जिल्ह्य़ात वैरागच्या भूमीमध्येदेखील १९७२ च्या दुष्काळाप्रसंगी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात सांडलेले रक्त कधीही विस्मरणात जाणार नाही. या शेतकरी हुतात्म्यांचे स्मारक सतत प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन शेकापचे ज्येष्ठ नेते  प्रा. भाई एन. डी. पाटील यांनी केले.
१९७२ सालच्या भीषण दुष्काळात वैराग येथे शेतकऱ्यांनी शेकापचे नेते चंद्रकांत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रखर आंलोलन केले होते. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आठ शेतकरी शहीद झाले होते. या शहीद शेतकऱ्यांचे स्मारक वैराग ग्रामपंचायतीने उभारले आहे. त्याचा अनावरण सोहळा प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या वेळी बोलताना गतकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी चंद्रकांत निंबाळकर यांच्यासह शेकापचे नेते आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार भाई एस. एम. पाटील, राजेंद्र राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. पाटील पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे पूर्ण झाली तरीही मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न अद्याप भेडसावत आहे. साधे साधे मूलभूत विकासाचे प्रश्न कायमच आहेत. शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून त्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यास राज्यकर्तेच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
न्या. देशमुख यांनी, शेतकऱ्यांनी मतदानाद्वारे एकजूट दाखविल्याशिवाय त्यांच्या हिताचे राज्य निर्माण होणे अशक्य असल्याचे मत मांडले. तर आमदार गणपतराव देशमुख यांनी १९७२ च्या दुष्काळानंतर ४० वर्षे झाली तरीही अद्याप आम्हाला हाताला काम व धान्य, पाणी मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन करावे लागत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. या वेळी भाई एस. एम. पाटील, आमदार राजेंद्र राऊत, वैरागचे सरपंच संतोष निंबाळकर आदींनी विचार मांडले. या वेळी चंद्रकांत निंबाळकर यांच्यासह हुतात्मा शेतकऱ्यांच्या वारसदारांचा ह्द्य सत्कार करण्यात आला.   

Story img Loader