डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या झाली आणि चेहरा आठवला तो मारुती बनसोडेचा. मारुतीचा खंडोबाबरोबर पट लावलेला. पट लावणे म्हणजे त्या देवाला तो वाहणे. कधी तरी लहानपणी त्याला सोडलेला. मारुतीला जेव्हा देवासाठी सोडला तेव्हा तिखट आणि गोड जेवणाचा बेत अख्ख्या गावाला देण्यात आला. एकाच वेळी बकऱ्याचा नैवेद्य आणि दुसऱ्या बाजूला पुरणपोळी. लहानग्या मारुतीच्या समोर भंडारा उधळणारे अनेक हात. एका तांब्यात कोणी तरी गोमूत्र घेतलेले. भंडारा तोंडावर उधळला आणि गोमूत्र शिंपडले की, हलग्याचा प्रचंड आवाज होई आणि नंगर तुटला की देव पावला, असे म्हणत मुलगाच देवाच्या चरणी सोडायचा. लोखंडाचा एक गज जमिनीत गाडून ठेवायचा आणि दोघांनी तो ओढून काढला की, ‘विधी’ पूर्ण झाल्याचे कोणी तरी सांगायचे. मारुती बनसोडे भंडारा उधळीतच मोठा होत गेला. पुढे कुठेतरी त्याला डॉ. दाभोलकर भेटले. मारुती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पूर्णवेळ कार्यकर्ता झाला आणि त्याने पोतराज निर्मूलनाचे काम हाती घेतले..
एखाद्याला पोतराज सोडले की, त्याचे नाते शिवाशी. डोक्यावरचे केसही तसेच वाढवायचे. त्याचा बुचडा बांधायचा. ज्या-ज्या गावात देवीची मोठी मंदिरे आहेत, तेथे-तेथे अशी मुले दिसतात. तुळजापूर, नळदुर्ग, अंबाजोगाई, येरमाळा, कर्नाटकातील संनती, गुलबर्गा, आळंद या भागात अशी बुचडा बांधणारी मुले अलीकडे शाळेतही जातात. मुलींसारखी केस वाढविणारी अशी मुले दिसली की, त्यांना बाकीची मुले ‘बायल्या-बायल्या’ म्हणून चिडवत. मग अशी मुले शाळा सोडून द्यायची. कोण नेणार यांना शाळेत, हा प्रश्न दाभोलकरांना सतावत असे आणि म्हणूनच त्यांनी मारुती बनसोडे याला पोतराज निर्मूलनाचे काम दिले. एका दैनिकात १८ फेब्रुवारी १९९६ रोजी बातमी प्रकाशित झाली. शीर्षक होते ‘दीप्या पोतराज झाला दीपक मस्के’. शिवाशी पट लावलेल्या अशा अनेक मुलांचे केस कापण्याचे आंदोलन हाती घेण्यात आले. दीपक मस्के केस कापायला तयार झाला तेव्हा त्याचे केस कापण्यासाठी कोणी न्हावीच तयार होईना. शेवटी एका गरजू न्हाव्याला ५१ रुपये दिले गेले आणि त्याने पोतराजाचे केस कापले.
अशा किती तरी मुलांना नंतर शाळेत आणण्यासाठी मारुती बनसोडे झटला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तेव्हा ६० पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. काही दिवस मेधा पाटकरांनीही त्यात काम केल्याचे मारुती बनसोडे सांगतो. या सर्व कार्यकर्त्यांना दरमहा ५०० ते ६०० रुपये दिले जात असत. पुढे हे मानधन हजार रुपये झाले. हे पैसे दर महिन्याला मिळावे, असा दाभोलकरांचा कटाक्ष होता. केवळ दीपक मस्के नाहीच तर धनंजय मस्के, राहुल माने अशी कितीतरी पोतराजांची नावे. आता ही मंडळी मुंबई-पुण्यात जगत आहेत.
जग बदलाचा वेग वाढला. भोवताल झपाटय़ाने बदलत गेला. तंत्रज्ञान प्रगत होत गेले. श्रद्धा-अंधश्रद्धेतल्या सीमारेषा आपल्याला खरंच पुसता आल्या? श्रद्धांच्या बाजारपेठांमध्ये अनेक रुढी आजही कायम आहे. त्या घालविण्यासाठी १३ वर्षांपासून एक विधेयक चर्चेत होते, तेव्हा डॉ. दाभोलकर फक्त विधेयकासाठी झटत होते असे नाही, तर ते गावोगावी असे मारुती बनसोडे घडवत होते.
खंडोबाशी पट लावलेला मारुती प्रबोधन चळवळीत आला. आता तो मुख्य प्रवाहात आहे. जगण्यासाठीच्या ‘लटपटी-खटपटी’ तोही करतो. सामान्यत: आदर्श म्हणावे, त्याचे वागणे आहे की नाही माहीत नाही. कारण त्यानेही एक संस्था काढली. अनुदान मिळविण्यासाठी बाकी जसे वागतात, तसे तोही वागला. त्याच्या संस्थेचेही ‘एनजीओ’मध्ये रूपांतर झाले. विदेशातूनही त्याने पैसे मिळविले. आजही तो सामाजिक काम करतो आहे. पण ज्या आíथक आणि सामाजिक पाश्र्वभूमीतून तो पुढे आला, समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळला. त्याचे सारे श्रेय डॉ. दाभोलकरांचे. ते गेले आणि आज पंचेचाळीशीत असलेल्या मारुती बनसोडेचा चेहरा आठवला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा