पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांची वणवण सुरू होते ती पदव्युत्तर शिक्षणासाठी. कोणता अभ्यासक्रम करू, कुठून करू, किती खर्च येणार, लोन मिळणार का? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत असतात. या प्रश्नांची उत्तरे आता मोबाइलवरील एका अ‍ॅपमध्ये मिळू शकणार आहे. व्हीजेटीआयच्या विद्यार्थ्यांनी हे अ‍ॅप तयार केले आहे.
पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण यातील आपल्याला हवा तो पर्याय कसा निवडायचा. आपण निवडत असलेली संस्था, विद्यापीठाची माहिती त्याची योग्यता या सर्व गोष्टींची माहिती आता तुम्हाला अ‍ॅपमध्ये मिळणार आहे. या अ‍ॅपमुळे आता भविष्यात तुमच्या मोबाइलमध्ये पदव्युत्तर शिक्षणाचा खजिनाच असणार आहे.
व्हीजेटीआयच्या ई-सेल आणि एचडीएफसीच्या क्रेडिला यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘मोबाइल अ‍ॅप’ विकसित करण्याची एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पध्रेतील अंतिम आठ संघांनी अ‍ॅप तयार केले असून यातून व्हीजेटीआय महाविद्यालयाच्याच ‘याम’ या संघाचे ‘द पीजी डायलेमा’ हे अ‍ॅप विजयी ठरले आहेत. ते लवकरच अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे हे अ‍ॅप ‘बोलके’ आहे. पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या संस्थांची माहिती, त्यांचे मूल्यांकन, तेथे उपलब्ध असलेल्या सुविधा आदी गोष्टी यामध्ये देण्यात आल्या आहेत. यात ‘लाइव्ह चॅट’चीही सोय उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे तज्ज्ञांना प्रश्न विचारता येणार आहेत. या अ‍ॅपमध्ये विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या तारखा, सूचना, अभ्यासाची पुस्तके या सर्व गोष्टींची माहिती पुरविली जाणार आहे. याचबरोबर लोनचे कॅल्क्युलेटरही या अ‍ॅपमध्ये देण्यात आले आहे.
याच स्पध्रेत के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘गेम चेंजर’ या संघाने ‘ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी फाइंडर’ हे अ‍ॅप विकसित केले असून त्यात अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या प्रवेश-परीक्षांना सामोरे जावे लागते, तेथील संधी, पात्रता आदी माहिती देण्यात आली आहे. हे अ‍ॅप सर्वात कमी वेळात बनविण्यात आले असून त्याला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. जीआरई, टोफेल आदी प्रवेश-परीक्षांचे गुण किती असणे अपेक्षित आहेत याची मर्यादाही या अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे.
तब्बल महिनाभर चाललेल्या या स्पर्धेत देशभरातून ५४ संघ सहभागी झाले होते. त्यांची छाननी होत अंतिम फेरीसाठी आठ संघांची निवड करण्यात आली होती. या संघांना आठ दिवसांचा कालावधी देण्यात होता. त्यात त्यांनी विषयाला साजेसे अ‍ॅप तयार करणे आवश्यक होते, अशी माहिती ई-सेलच्या महासचिव स्नेहा शंकर यांनी दिली. विजेत्या संघाला १५ हजार रुपये तर उपविजेत्या संघाला आठ हजार रुपये देण्यात आले. तसेच आठ पैकी ज्या संघांनी लवकर अ‍ॅप सादर केले अशा संघांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले.