जम्मू, पंजाब, हरयाणा, हिमाचल या राज्यांपुरता मर्यादित असलेला ‘माता की चौकी’ हा देवी जागरणाचा कार्यक्रम अलीकडे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या बडय़ा शहरांत मोठय़ा प्रमाणात होऊ लागल्याचे दिसून येत असल्याने हा कार्यक्रम सादर करणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. देवी जागरणाची संगीतमय परंपरा असणाऱ्या या कार्यक्रमांसाठी अकरा लाखापासून अकरा हजारापर्यंत बिदागी घेतली जात आहे. नवरात्रौत्सव काळात या कार्यक्रमांना नेहमीपेक्षा जास्त मागणी असून, आता या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रीय मंडळी आघाडीवर असल्याचे चौकी सादर करणाऱ्या कलाकरांनी सांगितले.
घरोघरी घटस्थापनेपर्यंत मर्यादित असलेल्या नवरात्रौत्सवाचे कालांतराने बाजारीकरण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवरात्र म्हणजे दांडिया असे एक समीकरण शहरांमध्ये तयार झाले असून, नावाला घटस्थापना किंवा देवी प्राणप्रतिष्ठा केली की संध्याकाळी दांडिया खेळायला मोकळे झालो, अशी गणिते अनेक मंडळे मांडताना दिसतात. मध्यरात्रीपर्यंत चालणारा धिंगाणा सर्वोच्च न्यायालयाने दांडियासाठी वापरण्यात येणाऱ्या डीजेच्या दणदणाटावर अंकुश आणल्याने हा आवाज निदान दहानंतर तरी बंद होत आहे. दांडियाच्या दणदणाटाला फाटा देऊन काही नवरात्रौत्सव मंडळांनी तसेच कुटुंबांनी काळाच्या पडद्याआड गेलेल्या देवीचे जागरण, गोंधळ, भजन या परांपरागत चालिरीती अंगाकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तालासुरात गाणाऱ्या कलाकारांच्या माता की चौकीचा बोलबाला सुरू झाला आहे.
सायन, धारावी, परळ, मुंबई सेंट्रल, कोपरखैरणे, जुईगाव या ठिकाणी येत्या नऊ दिवसांत सुमारे १८ कार्यक्रम सादर करणाऱ्या नवी मुंबईतील शिवशक्ती जागरण मंडळाने यासाठी कंबर कसली आहे. सर्वच जण देवी भक्त असणारे कलाकार आमच्या संगीत मंडळात असल्याचे सुरेशकुमार गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता गेली २० वर्षे हा कार्यक्रम सादर करीत असून अलीकडे नवरात्रौत्सव काळात एका दिवसात दोन ते तीन कार्यक्रम सादर करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. हे मंडळ ११ हजारापासून २१ हजारापर्यंतची एका कार्यक्रमाची बिदागी घेते.
या क्षेत्रात नरेंद्र चंचल यांचे नाव बिदागी घेण्यात आघाडीवर आहे. याशिवाय दर्शन घेणाऱ्या भाविकांची सढळ हस्ते होणारी मदत ही वेगळी असते. कार्यक्रमासाठी लागणारे बहुतांशी सामान ही मंडळी घेऊन येतात. पंजाबी, सिंधी घरापर्यंतच कालपरवापर्यंत मर्यादित असलेला हा कार्यक्रम अलीकडे मराठी, उत्तर भारतीय, मोठय़ा प्रमाणात सादर करू लागल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा