लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षांची हकालपट्टी करावी, महिला समृद्धी योजनेच्या कामकाजाची चौकशी करावी, मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण द्यावे यांसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र मातंग समाज संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
प्लास्टिकमुळे केरसुणी, सूप, दोरखंड तयार करण्याचा मातंग समाजाचा पारंपरिक व्यवसाय डबघाईस आला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून कर्ज दिले जात असले तरी त्यासाठी जाचक अटी असल्याने समाजाची घोर निराशा झाली असल्याचे समितीने म्हटले आहे.
महिला समृद्धी योजनेतही महामंडळाचे अध्यक्ष व त्यांच्या हस्तकांकडून मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करून या योजनेचा जिल्ह्यातील किती महिलांना लाभ झाला याची चौकशी करण्याची मागणीही समितीने केली आहे. समाजाला घरकुल योजनेंतर्गत घरे द्यावीत, नोकरभरतीतील मातंग समाजाचा अनुशेष भरून काढावा, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्रदान सोहळा जयंतीदिनी न करता वाट्टेल तेव्हा केला जात असल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली आहे. या पुरस्कारासाठी ऐन वेळी मनात येईल ती नावे घुसडविणाऱ्या संबंधित मंत्री व आमदारांचा निवेदनाद्वारे निषेध करण्यात आला आहे. निवेदनावर समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक साठे, सर्जेराव वाघ, दिलीप साठे, धनंजय  जाधव  आदींची स्वाक्षरी आहे.