मागासवर्गीयांना शिवणयंत्र व टीनपत्रे वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे साहित्य खरेदी करण्यात आली. त्यासाठी अनेकांचे प्रस्ताव आले. परंतु सत्ताधारी सदस्यांमध्ये लाभार्थी निवडीवरून एकवाक्यता होत नसल्याने साहित्य धूळखात पडले असून लाभार्थी वंचित आहेत.
जिल्हा परिषदेच्या शेष उपकरातून मागासवर्गीयांना शिवणयंत्र व टीनपत्रा वाटपासाठी ४२ लाख रुपये खर्च करून मार्चपूर्वीच साहित्य खरेदी करण्यात आले. यासाठी हिंगोली तालुक्यातून १ हजार १३, कळमनुरी २ हजार ५४८, सेनगाव १५७, औंढा नागनाथ १ हजार १० व वसमत ६५० याप्रमाणे प्रस्ताव आले. यातून शिवणयंत्रासाठी ५११ व टीनपत्र्यांसाठी ३८१ लाभार्थ्यांची निवड करायची आहे. यासाठी २६ लाख २५ हजार रुपयांची टीनपत्रे, तर १५ लाख ७५ हजार रुपये खर्चातून शिवणयंत्र खरेदी करण्यात आले. खरेदी केलेले साहित्य गोदामात, तर लाभार्थीचे प्रस्ताव समाजकल्याण विभागात धूळखात पडून आहेत. वास्तविक, आर्थिक वर्षांतील खरेदी केलेले साहित्य चालू आर्थिक वर्षांमध्येच वाटप करणे आवश्यक होते. जुलै महिना अध्र्यावर आला असतानाही सत्ताधारी सदस्यांमध्येच एकवाक्यता होत नसल्याने लाभार्थी मदतीपासून वंचित आहेत.