सर्व शिक्षा अभियानांतर्गत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व समावेशित शिक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यक्षेत्रातील शालेय व शाळाबाह्य़ अपंग मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साहित्य साधने उपलब्ध केली जात आहेत. या साहित्य साधनांचे वितरण उद्या शुक्रवारी, ७ डिसेंबर रोजी समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.
अपंग मुले-मुली म्हणजेच विशेष गरजाधारक लाभार्थ्यांची संख्या २०७१ एवढी असून त्यापैकी ४० मुला-मुलींना २६ व्हिलचेअर, ६ ट्रायसिकल व ८ रोलेटर अशी साहित्य साधने वितरित केली जाणार आहेत. या साहित्य साधनांचा वितरण समारंभ उद्या शुक्रवारी दुपारी चार वाजता महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या नव्या पेठेतील कार्यालय आवारात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने, आमदार विजय देशमुख व महापौर अलका राठोड आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती प्रा. व्यंकटेश कटके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बालकांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करताना नियमित अध्ययनात कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून त्यांना लागणाऱ्या विशेष शैक्षणिक साह्य़भूत सेवा व पायाभूत सोयी-सुविधा उपक्रमांतर्गत पुरविण्यात येतात. त्यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शून्य ते १८ वयोगटातील विशेष गरजाधिष्ठीत शालेय व शाळाबाह्य़ मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांची अपंगत्व निदान व उपचारात्मक शिबिरे आयोजिली जातात. गरजेनुसार कार्यात्मक मूल्यमापनामध्ये त्यांच्यातील आत्ममग्नता तपासणे, चष्मा नंबर काढणे, मानसशास्त्रीय चाचणी, कर्णबधिर मुलांसाठी श्रवणयंत्रे उपलब्ध करून देणे तसेच गरजेनुसार आवश्यक साहित्य साधने उपलब्ध करून देणे असा उपक्रम राबविला जातो. पालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यक्षेत्रात १११९ मुले व ९५२ मुली असे मिळून २०७१ विद्यार्थी विशेष गरजाधारक आहेत. यात मतिमंद-१०७, अस्थिव्यंग-२१३, कर्णबधिर-९८, दृष्टिदोष-९४२, बहुविकलांग-३८, अध्ययन अक्षम-४९४, मेंदूचा पक्ष्याघात-२०, वाचादोष-१४६, पूर्णत: अंध-१२ व स्वमग्न-४ याप्रमाणे विशेष गरजाधारक मुले-मुली आहेत, अशी माहिती सभापती प्रा. कटके यांनी दिली. यावेळी शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सत्यवान सोनवणे यांच्यासह सदस्य पांडुरंग चौधरी, दत्तात्रेय गणपा, अरुणा वर्मा, जावेद खैरदी, गौरीशंकर जक्कापुरे आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा