राज्य लॉटरीच्या विक्रीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमिशनऐवजी झटपट लॉटरी विकून रग्गड नफा कमावण्याची सवय झालेल्या काही विक्रेत्यांनी पृथ्वी, बाबा, अजित या नावाच्या झटपट लॉटऱ्या बंद झाल्यामुळे आता थेट मटक्याकडे मोर्चा वळविला आहे. गेले काही वर्षे बंद असलेला मटका आता पुन्हा सुरू झाला आहे. या मटक्याला या विक्रेत्यांनी ‘एक अंकी लॉटरी’ असे गोंडस नाव दिले आहे. महिन्याकाठी मिळणाऱ्या भरमसाठ हप्त्यांमुळे स्थानिक पोलीसही याकडेही डोळेझाक करीत आहेत.
केंद्र शासनाच्या लॉटरीविषयक कायद्यानुसार, झटपट वा एक अंकी लॉटरीला राज्यात बंदी आहे. राज्य लॉटरीची विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांनी राजरोसपणे फ्री गिफ्ट कुपन्सच्या नावाखाली झटपट लॉटरीची विक्री सुरू केली होती. लालबाग, परळ, काळाचौकी, दादर, करी रोड आदी प्रामुख्याने गिरणगाव परिसरात ही विक्री जोरात होती. अगदी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावातील आद्याक्षरे ‘पृथ्वी’, ‘अजित’ तसेच टोपण नावे ‘बाबा’, ‘दादा’ अशी वापरून शासनाच्या नाकावर टिच्चून झटपट लॉटरी चालविण्याची हिंमत या माफियांनी दाखविली होती. परंतु या प्रकरणी थेट गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सुरुवातीला डोळझाक करणाऱ्या पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली. त्यामुळे झटपट लॉटरीची दुकाने बंद झाली. मात्र काही ठिकाणी लपूनछपून आजही झटपट लॉटरी सुरू आहे.
पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याने आता विक्रेत्यांनी नवे स्वरूप धारण करीत एक अंकी लॉटरीच्या नावाखाली मटका सुरू केला आहे. मात्र हा मटका नाही. ही एक अंकी लॉटरी आहे, असा दावा या विक्रेत्यांनी केला आहे. परंतु लॉटरीविषयक कायद्यानुसार राज्यात एक अंकी लॉटरीच्या विक्रीलाही बंदी आहे. एक अंकी लॉटरीची विक्री करताना कुठलेही कुपन वा तिकीट दिले जात नाही. एका चिठ्ठीवर लिहून दिले जाते. दर १५ मिनिटांनी नंबर जाहीर केले जातात. मात्र हे नंबर कोण ठरविते हे गुलदस्त्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मटका जेव्हा जोशात होता तेव्हा सायंकाळच्या वेळी नंबर घोषित होत असे. काही मटका माफिया हे नंबर जाहीर करायचे.
झटपट लॉटरी आणि मटका!
झटपट लॉटरीला गिफ्ट कुपन्स हे नाव होते तर या मटक्याला ‘एक अंकी लॉटरी’ असे नाव आहे. यासाठी एक चिठ्ठी दिली जाते. यावर पेनाने तीन नंबर लिहिलेले असतात. वरच्या कोपऱ्यात किती रक्कम घेतली हे लिहिले जाते. हे तिन्ही नंबर जुळले तर संबंधिताला नऊ पट पैसे मिळतात. परंतु नंबर कधीच जुळत नाहीत, असाच अनुभव असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा