विशाल भारद्वाजचा चित्रपट म्हणजे आशय-विषय आणि मांडणी यादृष्टीने सर्वार्थाने वेगळा अशी ख्याती आहे. परंतु, त्यांचा गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘मटरू की बिजली का मंडोला’ हा चित्रपट गल्लापेटीवर सपशेल अपयशी ठरला.
पहिल्या पाच दिवसांचा जागतिक स्तरावरचा गल्ला ३२.५ कोटी रुपये गोळा झाला. चित्रपटाचे बजेट ३३ कोटी रुपये इतके होते.
‘ओय बॉय’ हे गाणे आणि चित्रपटाचे ‘चिवित्र’ शीर्षक यामुळे चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झाले होते. परंतु, या शीर्षकामुळेच चित्रपट अपयशी ठरला असे बोलले जात आहे.  हरयाणातील ग्रामीण भागातील घटनांच्या पाश्र्वभूमीवर घडणारे कथानक असले तरी त्यात विषय नावीन्य फारसे नव्हते.
अलीकडे हिंदी चित्रपट प्रदर्शित होतो त्या शुक्रवारपासून ते रविवापर्यंतच्या वीकेण्डवर बॉलीवूडमध्ये सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. पहिल्या वीकेण्डला चित्रपटाने चांगला गल्ला गोळा केला तर पुढे तो आणखी चालण्याची शक्यता निर्माण होते. परंतु, मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धी आणि विपणन करूनही ‘सबकुछ’ भारद्वाज असलेला हा चित्रपट वीकेण्डलाही तग धरू शकला नाही याचे आश्चर्य वाटले, असे मत बॉलीवूडचे व्यवसाय विश्लेषक एन. पी. यादव यांनी व्यक्त केले.
चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ७.०२ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ७.४० कोटी रुपये तर रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी केवळ ८ कोटी रुपये गल्ला गोळा झाल्याने वीकेण्डचा गल्ला अंदाजे २२.४२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला, अशी माहिती व्यवसाय विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली. सिनेमॅक्स इंडियाचे गिरीश वानखेडे म्हणाले की, या चित्रपटाचा अखिल भारतीय स्तरावरचा अंदाज घेतला तर असे लक्षात येईल की, चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटगृहांतील साधारणपणे ३५ टक्के, दुसऱ्या दिवशी ३७ टक्के तर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी फक्त ३८ टक्के प्रेक्षक होते.
बॉलीवूड व्यवसायाच्या दृष्टीने गल्लापेटीवर निराशाजनक कामगिरी करूनही खुद्द विशाल भारद्वाज यांच्या मते मात्र चित्रपटाला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ते म्हणाले की, आपला देश एका संक्रमणावस्थेतून जात आहे. त्यामुळेच मला विनोदाच्या भट्टीतून राजकीय-सामाजिक उपहास दाखवायचा होता. तरुणाईला हा उपहास समजला, आवडला असेही भारद्वाज यांनी म्हटले आहे.

Story img Loader