नागपुरात किती समाज भवने आहेत, यासंबंधी कुठलीही आकडेवारी महापालिकेत नसल्याचे उघड झाले असून समाज भवनांचा सध्या काय उपयोग होत आहे, याचा शोध घेण्याचे तसेच यासंबंधीचा अहवाल पुढील बैठकीत ठेवण्याचे आदेश महापौरांनी महापालिकेच्या विशेष सभेत दिले.  
बजेरियातील समाज भवनात जकात चोरीचा माल ठेवण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. त्यापोटी २२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. समाज भवनाचा वापर अवैध रितीने होत असल्याचे उघड झाले. या विषयावर महापालिकेच्या विशेष सभेत वादळी चर्चा झाली.
समाज भवन जकात चोरीचा माल ठेवण्यासाठी वापरले जात आहे, याकडे विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी सदनाचे लक्ष वेधले. याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला. सत्तारूढ सदस्य सुनील अग्रवाल यांनीही प्रशासनावर ताशेरे ओढत समाज भवन देण्याचा अधिकारी कुणाला आहे, त्याबाबत कोण नोंद ठेवतो, असे प्रश्न त्यांनी विचारले. थासदार व आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या इमारतीची नोंदणी महापालिका प्रशासनाजवळ आहे काय, असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केला. सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनीही प्रशासनावर कोरडे ओढले.
सदस्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर प्रशासन देऊ शकले नाही. शहरात किती समाज भवन आहेत, कुठल्या निधीतून ते बांधण्यात आले आहेत, यासंबंधी रेकॉर्ड महापालिकेत नसल्याचे उघड झाल्याने इतर सदस्यही अवाक् झाले. शहरात किती समाज भवने आहेत, ते कुठल्या निधीतून बांधण्यात आले, त्यांची सद्यस्थिती, वापर वगैरे सखोल तपासणी करून त्याचा अहवाल पुढील बैठकीत ठेवण्याचे आदेश महापौर अनिल सोले यांनी दिले.
महापालिकेला दीडशे वर्ष झाली आहेत. यासंबंधिक प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. २०१३ मध्ये महापालिकेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. यापूर्वी १९६४ मध्ये शताब्दी साजरी करण्यात आली. तेव्हा तत्कालीन राष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आले होते. यंदाही विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केले जाईल. प्रशासनाला गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास लिहिण्यास सांगण्यात आले आहे. वर्षभरात यानिमित्ताने चर्चा, परिसंवाद तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, असे महापौरांनी सभागृहात
सांगितले.    

Story img Loader