पिसाचा मनोरा
‘किती दिवसांनी घरच्यांमध्ये परतलेय.. माझी खोली, घरचं जेवण, खिडकीतून दिसणाऱ्या टेकडय़ा.. सारं हवंहवंसं.. तरीही काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटतंय.. तिथे सारं परकं होतं – ते शहर, तिथली माणसं, पण तरीही..!  आपल्याला फक्त रोजच्या जगण्याची सवय होत जाते आणि ती सवय मोडली की आठवण येते..’ माऊला वाटलं.
‘पण आठवतं, ते तरी काय? हॉस्टेलचे ते दिवस, कॉलेजचं आवार, कॅन्टीन, मित्रमैत्रिणी.. जे पुन्हा कधी भेटतील, कुणास ठाऊक. मित्रमैत्रिणी.. तिच्या ओठावर स्मित उमटलं. एक खडूस सोडला तर मित्रमैत्रिणींत कुणाबद्दल तक्रारीला जागा नाही. हा एक खडूस मात्र जगावेगळा. माणूसघाणा, फारसं इतरांमध्ये न मिसळणारा; पण त्यामुळे त्याला अधिक समजून घ्यावसं मला वाटलं का? नाही माहीत.
पण एवढं मात्र नक्की की, वाटला तितका तुसडा नव्हता तो. विक्षिप्त होता, पण स्वत:च्या मतावर ठाम असायचा, पण आपल्याहून भिन्न मतं असू शकतात, हे त्याला सपशेल मान्य होतं. त्याच्यासोबत असताना निश्चिंत वाटायचं.
 .. छे, का एवढं पुराण लावतेय त्याचं! तो नव्या अभ्यासात बुडाला असेल! आपलं नसणं त्याला जाणवत तरी असेल का? तसं असतं तर फोन नसता का केला त्याने? निदान एसेमेस, किमान एखादा मेल? मी करू का त्याला फोन? नको, अभ्यासात असेल, उचकेल! एसेमेस? तो डिस्टर्ब होईल. मेल? उघडून वाचेल तरी का, कुणास ठाऊक! त्यापेक्षा जाऊ दे ना! वाटलं तर तोच करेल फोन.’
० ० ०
मन्या घरी आला, आणि पुन्हा त्यानं सॅक टेबलावर भिरकावली. शांत, निपचित पडून राहावं, नाहीतर कुणावर तरी डाफरावं असं त्याला वाटत होतं. काय होतंय त्याला कळत नव्हतं. त्याच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. तिला फोन करायचाच. कशी आहेस विचारायचं. ती नक्की बोलेल. नक्की विचारेल – का केलास फोन? कायम असेल तिचा नेहमीचा- का?
मन्यानं माऊचा नंबर फिरवला.. एका रिंगमध्ये तिनं तो उचलला.. जणू ती फोनचीच वाट बघत होती. पण ती काही बोललीच नाही. मन्याला एक हंदका ऐकू आला. तो कढ ओसरला आणि तिने फोन ठेवला.
कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरचा हाच काय तो तिचा झालेला पहिला संपर्क.. मन्याला पुरेसा वाटला. कदाचित तिलाही!
त्याच्या मनातील साऱ्या शंका मिटल्या. गेले कित्येक दिवस मैत्रीच्या पलीकडच्या नात्याची त्याला लागलेली चाहूल आज पुरती स्पष्ट झाल्याचं त्याला जाणवलं आणि कित्येक दिवसांनंतर त्याला निवान्त वाटलं..
..‘बी माय व्हॅलेन्टाइन, असं माऊला सांगायचं,’ त्याने मनोमन पक्कं केलं.
-‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने..

Story img Loader