मे महिन्यात लग्नाचे खूप मुहूर्त असल्याने या महिन्यात सगळ्यात जास्त लग्नाचे बार उडणार आहेत. जून आणि जुलै महिन्यात अनुक्रमे फक्त दोन आणि तीन मुहूर्त असल्याने सगळ्यांची पसंती मे महिन्यातच लग्न करण्याकडे असणार आहे.     
३१ दिवसांच्या मे महिन्यात तब्बल १५ दिवस लग्नाचे मुहूर्त असून या सर्व तारखांना हॉल आणि मंगल कार्यालयांचे आगाऊ आरक्षण यापूर्वीच ‘फुल्ल’ झाले आहे. मे महिन्यात २, ३, ६, ११, १२, १३, १८, २०, २१, २२, २३, २५, २७, २८, २९, ३० या तारखांना लग्नाचे मुहूर्त आहेत. एप्रिल महिना संपत आल्याने मे महिन्यातील लग्नाचे मुहूर्त आणि सर्व तयारी करण्यासाठी लगीनघाई सुरू झाली आहे.
जून आणि जुलै महिन्यात लग्नाचे मुहूर्त फारसे नाहीत. त्यामुळे पत्रिका आणि मुहूर्त याचा विचार करून लग्न करणाऱ्यांसाठी आगामी तीन महिने महत्त्वाचे आहेत. या तीन महिन्यांत लग्न केले नाही तर थेट नोव्हेंबपर्यंत थांबावे लागणार आहे. कारण चातुर्मास असल्याने ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत लग्नाचे मुहूर्त नाहीत. पुन्हा तुळशीचे लग्न झाले की नोव्हेंबरपासून लग्नाचे मुहूर्त सुरू होतील.
यंदा जानेवारी, फेब्रुवारीत लग्नमुहूर्त होते. परंतु मार्चमध्ये एकही मुहूर्त नव्हता. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पुन्हा लग्नाचे मुहूर्त असून ते अनुक्रमे १८, १९, २०, २५ ते ३० नोव्हेंबर आणि ४, ६, ७, ८, १०, १२, १३, १७, २६ आणि २८ डिसेंबर या तारखांना आहेत. त्यामुळे मे महिन्यातील लग्नाचे मुहूर्त साधून घेण्यासाठी सर्वाची धावपळ सुरू झाली उपवर वधू-वरांबरोबरच लग्नाचे हॉल, मंगल कार्यालये, कॅटर्स, शालू, पैठणी आणि साडय़ा तसेच सोन्याचे दागिने करणारे सराफ, व्यासपीठ सजावटकार आदी सर्वाची ‘लगीनघाई’ सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा