इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) व रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल १० वर्षांनंतर सरकारला जाग आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मेयो रुग्णालयाचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तीन इमारतींच्या बांधकामासाठी ७४ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
मेयोच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव सरकारकडे गेल्या १० वर्षांपासून व मुख्यमंत्र्यांकडे दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी तसेच शहरातील मेडिकलच्या कर्करोग विभागातील रेडिएशनचा सोर्स बदलण्यासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा करूनही हा निधी वितरित करण्यात आला नाही. याबाबत कोणती कार्यवाही करण्यात येत आहे, अशी विचारणा आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या बैठकीत मेयो रुग्णालयाचे आधुनिकीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. या रुग्णालयात २५० खाटांसाठी नवीन इमारतीच्या बांधकामाला ११ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून आठवडाभरात काम सुरू करण्याचे आदेश देण्यात येतील. मेडिकलमधील रेडिएशनचा सोर्स ५० टक्के कमी झाला आहे. रेडिएशनचा सोर्स बदलण्यासाठी एक कोटी रुपये देण्यासाठी मान्यता देण्यात आली होती, आता यासाठी १ कोटी, ६० लाखांची तरतूद केली जाणार आहे, असे डॉ. गावित म्हणाले.
रुग्णालयाच्या इमारती आधुनिक करू, असे सांगितले होते, परंतु जुन्या इमारतींची दुरुस्ती केली जात आहे, ही जनतेची फसवणूक आहे. मेयोच्या विकासासाठी ‘इंटिग्रेटेड प्लॅन’ तयार करण्यात आला होता. त्यावेळी ३०० कोटी रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. आता मेयोमध्ये ५०० खाटांची व्यवस्था करण्याची आवश्यकता असताना केवळ २५० खाटांसाठी इमारती बांधण्यात येत असल्याने शहरवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे आमदार फडणवीस म्हणाले. यावर मेयोच्या तीन इमारतीच्या बांधकामासाठी ७४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून कामासाठी निविदा काढण्यात आली आहे, असे उत्तर डॉ. गावित यांनी दिले. या प्रश्नावर चर्चा सुरू असताना तुमचे म्हणणे समजून घेण्यासाठी या संदर्भात एक बैठक बोलावतो, असे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगून या प्रश्नावरील चर्चा थांबवली.
आ. राणा मार्शलकरवी सभागृहाबाहेर
आमदार रवी राणा यांना बुधवारी विधानसभेतून मार्शलकरवी बाहेर काढण्यात आले. राणा यांनी बुधवारी विविध मागण्यांचा उल्लेख असलेले शर्ट घालून प्रवेश केला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच ते अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या आसमासमोर गेले आणि प्रश्नांबाबत चर्चा करण्याची मागणी केली. अध्यक्षांनी त्यांना सभागृहाबाहेर जाऊन ते शर्ट काढून येण्यास सांगितले, पण तेथून ते परत न फिरल्याने अध्यक्षांनी राणा यांना दिवसभराच्या कामकाजात सहभागी न होण्याचे निर्देश देऊन मार्शलकरवी बाहेर काढण्याचा आदेश दिला. मार्शलांनी राणा यांना सभागृहाबाहेर काढले.

Story img Loader