नागपूर महापालिका आाणि जिल्हा परिषदेमध्ये महापौर आणि अध्यक्षपद ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आल्यामुळे भाजपमध्ये इच्छुक असलेल्या दावेदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ते आता वरिष्ठ नेत्यांकडे मोर्चेबांधणीसाठी कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये जनहिताची कामे जनतेपुढे मांडून मते घेण्याचे कसब असलेल्या आणि भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी ठरविलेल्या नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्याच्या गळ्यात महापौर आणि अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
महापौर अनिल सोले यांचा कार्यकाळ ५ सप्टेंबरला तर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे यांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत नव्या महापौर आणि अध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे. महापौर पदासाठी सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, माजी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे, नासुप्रचे विश्वस्त छोटू भोयर, आरोग्य सभापती रमेश सिंगारे, जलप्रदाय समितीचे सभापती सुधाकर कोहळे आणि नीता ठाकरे यांची नावे चर्चेत आहे. प्रवीण दटके यांच्यावर सध्या सत्तापक्ष म्हणून जबाबदारी असली तरी त्यांची प्रशासनावर त्यांची पकड आहे. अविनाश ठाकरे यांच्याकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद असताना त्यांच्याकडे प्रशासनाकडून काम करून घेण्याची क्षमता आहे. प्रवीण दटके यांनी मध्य नागपुरातून तर ठाकरे, भोयर, कोहळे आणि सिंगारे हे दक्षिण नागपूर मतदारसंघासाठी प्रयत्न करीत आहेत. दटके यांना महापौरपद देण्यात आले तर मध्य नागपूरमध्ये कुंभारे यांचा मार्ग मोकळा होईल. शिवाय भाजप संलिग्नत असलेल्या नागपूर विकास आघाडीमध्ये असलेले काही ओबीसी अपक्षांनी दावे केले आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. पश्चिम नागपूरकडे आतापर्यंत महापौर असल्यामुळे यावेळी मध्य नागपूर किंवा दक्षिण नागपूरला मिळावे, अशी काही सदस्यांकडून मागणी केली जात आहे. याशिवाय भूषण शिंगणे यांच्यासह अश्विनी जिचकार, चेतना टांक या नगरसेविका या पदासाठी उत्सुक आहेत. या पदासाठी रस्सीखेच सुरू असली तर दटके यांचे पारडे जड आहे. वाडय़ावर त्यांचा प्रभाव असला तरी गडकरी कोणाच्या नावाचा लिफाफा काढतात? याकडे सवार्ंचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गोतमारे यांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नव्या सदस्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती असल्यामुळे विधानसभा निवडणुका समोर असताना राष्ट्रवादी-भाजप अशी युती पुन्हा केली की जाते का? याबाबत शंका आहे. आतापर्यंत अध्यक्षपद भाजपकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जर भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला तर उपाध्यक्षपद महायुतीकडे राहण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी कोदामेंढीच्या शकुंतला हटवार, धापेवाडाच्या अरुणा मानकर, धांदलाच्या निशा सावरकर आणि नरसाळाच्या शुभांगी गायधने या दावेदार आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे वर्चस्व असले तरी या ठिकाणी नितीन गडकरी यांनी केलेली निवड ही अंतिम आहे.
महापौर व जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदारांमध्ये रस्सीखेच
नागपूर महापालिका आाणि जिल्हा परिषदेमध्ये महापौर आणि अध्यक्षपद ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आल्यामुळे भाजपमध्ये इच्छुक असलेल्या दावेदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
आणखी वाचा
First published on: 19-08-2014 at 07:32 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor and zp presidentship in nagpur