शहरातील रस्ते, पाणी, प्रदूषण, वाहतूक व्यवस्था आदी विविध मूलभूत समस्या दूर करून विकास करण्याच्या उद्देशाने महापालिकेने गेल्या दोन वर्षांत लोकसहभागातून आणि प्रशासन पातळीवर अनेक चांगले उपक्रम राबविले असले तरी समस्या मात्र आजही कायम आहेत. त्यामुळे उपक्रमाचे फलित काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहराच्या विकास होत असल्याचा सत्तापक्षाकडून केला जात असताना विरोधी पक्ष नेत्यांनी आणि नागरिकांनी महापालिकेच्या बेताल कारभाराबद्दल आवाज उठवणे सुरू केले आहे. महापौर अनिल सोले शहराचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेंसडर’ म्हणून काम करीत असून प्रत्यक्षात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे त्यांना वेळ नसल्याचे चित्र आहे.
महापालिकेत सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर शहरातील नागरिकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. निवडणुकीच्या काळात शहराच्या विकासासंदर्भात नागरिकांना अनेक आश्वासने देऊन त्याची पूर्तता करण्यात येणार जाहीर केले होते. दिलेल्या आश्वानानुसार शहरातील विकास कामे जलदगतीने होऊन शहराचा चेहरा मोहरा बदलेल असे वाटले होते मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षांत विकासाच्या नावाखाली लोकसहभागातून केवळ उपक्रम राबविले गेले मात्र, विकास कुठेच दिसून येत नाही. सामान्य नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असताना आणि समोर लोकसभा निवडणुका बघता राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस या राजकीय पक्षासह विविध सामाजिक संघटनांतर्फे मोर्चे आणि निदर्शने केली जात आहे. शिवाय सत्तापक्षामध्ये सहभागी असलेल्या अनेक अपक्ष सदस्य कामे होत नसल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत.
शहरातील विविध विकास कामे प्रशासन पातळीवर राबविणे शक्य नाही. त्यामुळे शहराचा विकासात लोकांचे योगदान असावे या उद्देशाने अनिल सोले यांनी गेल्या दीड वर्षांत लोकसहभागातून नागनदी स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती मूर्ती विसर्जन, स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम आदी योजना राबविल्या. त्या योजनांना काही सामाजिक संघटनासह नागरिक आणि शासकीय पात़ळीवर प्रतिसाद मिळाला मात्र, शहराच्या विकासात फारसा बदल दिसून आला नाही. यावर्षी अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागातील रस्त्यांची अवस्था फारच वाईट झाली आहे. दिवाळी सुरू होऊनही वाहनधारकांना खड्डय़ांमधून मार्ग काढावा लागत आहे. रस्ते दुरुस्त करण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून कुठलीच उचलण्यात आलेली नाहीत. ज्या भागात जावे त्या भागात खड्डय़ाचे प्रमाण दिसून येते. कंत्राटदाराचे पैसे न दिल्याने शहरातील सिमेंट रोडचे काम गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. नागनदी स्वच्छता मोहीम राबविली गेल्यानंतर काही दिवस त्याची निगा राखण्यात आली मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे. वृक्षारोपण मोहिमेत शहरातील विविध भागात लाखाच्यावर वृक्षलागवड करण्यात आली. डेग्यू आणि मलेरियाची साथ वाढत असताना रोगमुक्त नागपूर करण्यासाठी सुंदर नागपूर स्वच्छ नागपूर ही योजना लोकसहभागातून राबविण्यात आली. अभियान संपल्यानंतर पुन्हा कचऱ्यांचे ढीग दिसू लागले आहेत.
 सत्तापक्षाचा प्रशासनावर वचक राहिला नसल्यामुळे आणि एलबीटीमुळे महापालिकेची आर्थिक परिस्थित कमकुवत झाल्याने विकास कामे रखडली आहेत. शहराच्या विकास कामासंदर्भातील योजनांसाठी पैसा नाही अशी ओरड केली जात असल्यामुळे लोकसहभागातून प्रत्येक उपक्रम राबविण्याचा महापौरांनी गेल्या काही दिवसात सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे प्रशासन जर एखादी गोष्ट करीत नसेल तर लोकसहभागातून उपक्रम राबविण्यात येईल असा इशारा देण्यास ते विसरत नाही. महापालिकेने गेल्या दीड ते दोन वर्षांच्या काळात अनेक चांगले उपक्रम राबविले, योजना अंमलात आणल्या, त्याचे देशपातळीवर कौतुक होऊन पुरस्कार मिळाले आहे मात्र, शहराच्या विकासाचे आणि नागरिकांच्या समस्यांचे काय हा प्रश्न मात्र आजही कायम आहे.