रमाई आवास योजनेंतर्गत ४ लाभार्थीना महापौर शीला शिंदे यांच्या हस्ते आज धनादेश देण्यात आले. मनपाकडे या योजनेंतर्गत अनुदानासाठी आलेल्या तब्बल ९०० अर्जापेकी फक्त २३ अर्ज पात्र ठरले असून उर्वरित अर्ज जागा व अन्य सरकारी अटी पूर्ण होत नसल्याने विनानिर्णय प्रलंबीत आहेत.
राज्य सरकारने अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी म्हणून ही रमाई आवास योजना सुरू केली आहे. यात लाभार्थीने स्वत:च्या जागेवर शौचालयासह घर बांधले की त्याला सरकार मनपाच्या माध्यमातून प्रत्येकी २ लाख रूपये अनुदान देणार आहे. मनपाला राज्य सरकारने यावर्षी १२५ घरांचे उद्दिष्ट दिले असून त्यासाठी २ कोटी ३१ लाख रूपये मनपाकडे वर्गही केले आहेत.
मनपाने लाभार्थी निश्चित करण्यासाठी अर्ज मागवले होते. त्यात ९०० अर्ज आले. मात्र, त्यातील बहुतेक अर्जदार ज्या जागेवर घर बांधत आहेत, ती जागा त्यांच्या नावावर नाही, वादात आहे, घरासाठी मनपाकडून बांधकाम परवानगी घेतलेली नाही, घराच्या आराखडय़ात शौचालयाचा समावेश नाही, मनपाच्या विविध परवानग्या घेतलेल्या नाहीत अशा अनेक अडचणी आहेत. लाभार्थी निश्चित करताना या सर्व तांत्रिक बाबी तपासण्याचे सरकारचे मनपाला आदेश आहेत.
महापौर श्रीमती शिंदे यांच्या हस्ते आज रामभाऊ साळवे, नामदेव साळवे, अशोक तुजारे, नलिनी पाटोळे यांना प्रत्येकी ६६ हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. त्यांच्या घराचे काम जसे पुढे जाईल (वीटकाम, प्लॅस्टर वगैरे) त्याप्रमाणे त्यांना पुढील टप्प्यातील रक्कम दिली जाईल असे महापौरांनी सांगितले. आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, नगरसेवक शिवाजी लोंढे, उपायुक्त (कर) संजीव परशरामी, प्रकल्पप्रमुख अभियंता आर. जी. मेहेत्रे आदी यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा