कमी पावसामुळे यंदा साक्री तालुक्यातील धरणे भरली नाहीत हे खरं असल्याने तालुक्यात संभाव्य टंचाईचे संकट असले तरी धुळेकरांना तालुक्यातून यंदा थेंबभरही पाणी देणार नाही, असा टोकाचा इशारा देत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी काढलेल्या मोर्चामागे आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकारण असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.
धुळ्याच्या महापौर मंजुळा गावित या साक्री मतदारसंघातील भाजपच्या पराभूत उमेदवार. साक्रीने अॅड. गोविंदराव चौधरी यांच्या रुपाने या आधी भाजपला आमदारकी आणि थेट मंत्रिपदही दिले आहे. हे कमी की काय खासदार म्हणून रामदास गावित यांनाही भाजपकडूनच संधी मिळाली. या राजकीय इतिहासाची उजळणी केल्यास साक्री विधानसभा मतदारसंघ म्हणजे कायम काँग्रेसचा निर्विवाद बालेकिल्ला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. भाजपच्या मंजुळा गावित यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवायचे निश्चित केल्यास आ. योगेश भोये हे अडचणीत येऊ शकतात. महापौर गावित यांना राजकीय समस्येत टाकण्याचा डाव साक्री तालुक्यातील विरोधकांनी आखला होता. असा निष्कर्ष काही राजकारण्यांनीच काढला आहे. धुळेकरांसाठी पिण्याचे पाणी मागविले आणि त्यासाठी प्रशासनावर दबावतंत्र वापरले तर जिथे भविष्यात आमदारकीचे स्वप्न पाहायचे आहे, त्या साक्रीकरांचा विरोध सहन करावा लागेल. जर का साक्री तालुक्यातून पाणी घेण्यासाठी आग्रही भूमिका घेतली नाही तर, ज्या धुळ्याचे महापौरपद सांभाळतो, त्या धुळेकरांचा रोष पत्करायचा. अशा दुहेरी कात्रीत महापौर गावित यांना पकडून साक्रीतील काँग्रेसजणांनी गावित यांना ‘चेकमेट’ केल्याचे मानले जात आहे.
आ. अमरीश पटेल यांचा साक्री तालुक्यातील धरण-पाण्याशी सूतराम संबंध येत नाही. पाणी देणारी धरणे आणि धुळे महापालिका या दोघांमध्ये आ. पटेल यांनी टाकलेली ठिणगी नंतर का विझली, याचे कोडे नियोजन मंडळाच्या बैठकीत नव्हे तर, तत्पूर्वीच उलगडले. धुळ्याने सतत पाणी मागण्याचे धंदे बंद करावेत, आपली यंत्रणा सक्षम बनवावी असे, आ. पटेल यांचे म्हणणे चुकीचे नव्हते आणि नाही, पण त्यांच्या या विधानाला राजकीय डावपेचाची किनार कशी होती आणि आ. पटेल यांचा शब्द लगेचच साक्रीकरांनी कसा झेलला, याची उत्तरे प्रशासन आणि राजकारणातील मातब्बरांनी शोधली नसतील तरच नवल. खरे तर धुळ्यासाठी एक हजार दशलक्ष घनफूट पाणी साक्री तालुक्यातील धरणांमधूनच आरक्षित झाले आहे. परंतु ते अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. यापासून आ. भोये, आ. पटेल हे अनभिज्ञ आहेत, असेही म्हणता येणार नाही.
एवढेच नव्हे तर, धुळ्याचे आ. अनिल गोटे यांनी तर एक्स्प्रेस कॅनॉलचा पाहणी दौरा करून त्याची साफसफाई कऱ्ण्याचीही तयारी पूर्ण केली आहे. पुढील काही दिवसात धुळेकरांना पाणी पुरवणारा तलाव याच एक्स्प्रेस कॅनॉलमधून पाणी आणून भरला जाणार आहे. साक्री तालुक्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेवून काँग्रेसने पाणी प्रश्नावर महापौर गावित यांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी कोंडी केली होती हे मात्र खरे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा