रोख रक्कम पालिकेच्या ‘तिजोरीत’!
कल्याण डोंबिवली महापालिकेने महापौर कबड्डी चषक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी मांडव व इतर खर्चासाठी सुमारे पाच लाखांचा खर्च करण्यात आला. पण कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना घटनास्थळी पारितोषिकाची रोख रक्कम किंवा धनादेश देण्याऐवजी त्यांची महापौर चषकावरच बोळवण करण्यात आल्याने विजेत्या संघांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या महिन्यात कल्याणमधील गायत्री शाळेसमोरील क्रीडांगणावर या कबड्डी स्पर्धा पार पडल्या. ठाणे जिह्य़ातील अनेक कबड्डी संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्यांना २५ हजार, १५ हजार, १० हजार, चार हजार अशी रोख पारितोषिके देण्याचे ठरले होते. या स्पर्धेत ठाण्यातील श्री माऊली मित्र मंडळ, वडूनवघर येथील आकाश मित्र मंडळ, महिला गटात ठाण्यातील शिवतीर्थ कबड्डी संघ विजयी ठरला. विजेत्या संघांना एकाच वेळी पारितोषिकाची रक्कम व चषक मिळाला तर होणारा आनंद सर्वाधिक असतो. या विजेत्या संघांना केवळ चषक दिले गेले. पारितोषिकाची रक्कम नंतर देण्यात येईल असे सांगून बोळवण करण्यात आली. याविषयी विजेत्या संघांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदारांची देयके तात्काळ काढणाऱ्या पालिकेला क्रीडाविषयक किती प्रेम आहे हे यानिमित्ताने कळले, अशी टीका क्रीडाप्रेमींकडून केली जात आहे.
महापालिकेच्या क्रीडा विभागातील अधिकारी म्हणाला, निधीच्या धनादेशावर आयुक्तांची सही झाली नाही म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरच विजेत्यांना त्यांची रक्कम देण्यात येईल. सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी म्हणाला, महापालिकेतून रोख रकमेची बक्षिसे देण्यात येत नाहीत. धनादेशाद्वारे देण्यात आलेल्या निधीला मुख्य लेखा अधिकारी मंजुरी देतात. लेखा परीक्षक मंजुरी देतात. मग ती रक्कम विजेत्यांना दिली जाते. स्पर्धकांना नक्कीच लवकर ही रक्कम देण्यात येईल.