शहराची पहिली महिला महापौर म्हणून मागच्या दोन वर्षांच्या कारभाराबद्दल आपण समाधानी आहोत. शहरात सध्या कोटय़वधी रुपयांची विकासकामे सुरू असून त्याचाच मोठा आनंद आहे असे शीला शिंदे यांनी म्हटले आहे.
मनपाच्या स्थापनेस उद्या (रविवार) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला महापौर शिंदे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे, की आमदार अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेले दोन वर्षे मनपात शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मात्र युतीसह सर्वच पक्षांच्या नगरसेवकांचे या काळात आपल्याला उत्तम सहकार्य लाभले. मनपाच्या इमारतीला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देता आले. सत्ता स्वीकारतानाच युतीने मुबलक पाणी, चांगले रस्ते, आरोग्य सुविधांचे वचन दिले होते. पाण्याच्या दुस-या टप्प्यातील योजनेचेही काम आता प्रगतिपथावर आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहराचा पाणीप्रश्न पूर्णपणे मार्गी लागेल. केडगाव पाणीयोजनेचेही रखडलेले काम मार्गी लावता आले, ही समाधानाची बाब आहे.
राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेतून प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून त्यातूनच प्रमुख रस्त्यांचे विद्युतीकरण करण्यात आले, त्यामुळे शहराचा चेहरामोहरा झळाळून निघाल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या एकात्मिक शहर योजनेतून २५ कोटी ५६ लाख रुपये खर्चाचा ८५२ घरकुलांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून नजीकच्याच काळात नागरी दलित वस्ती सुधार, सावेडीतील नाटय़संकुल, स्पर्धा परीक्षा केंद्राची इमारत आदी कामे मार्गी लावण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे.