नवे महापौर संग्राम जगताप उद्यापासून (बुधवार) महापालिकेच्या नियमित कामकाजाला सुरुवात करणार आहेत. अपूर्ण योजना शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी या कामांना तातडीने गती देणार असल्याचे त्यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
अडीच वर्षांनंतर मनपात राजकीय सत्तांतर झाले. मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सोमवारी नव्या महापौर-उपमहापौराची निवडणूक होऊन या सत्तांतरावर शिक्कामोर्तब झाले. निवडीनंतर लगेचच पालकमंत्री मधुकर पिचड व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह दोन्ही काँग्रेसचे निरीक्षक, स्थानिक पदाधिका-यांसमवेत सोमवारीच महापौरपदाची सूत्रे स्वीकारली, त्यामुळे वेगळा काही औपचारिक कार्यक्रम आता करायचा नाही. उद्यापासून (बुधवार) लगेचच मनपाच्या नियमित कामकाजाला सुरुवात करणार आहे असे जगताप यांनी सांगितले.
नगरोत्थानमधील प्रलंबित बालिकाश्रम रस्ता, कोठी रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामाला तातडीने गती देण्याला आपले प्राधान्य आहे असे जगताप यांनी सांगितले. ते म्हणाले, मागच्या आपल्या कारकीर्दीतच मनपाच्या अनेक योजना राज्य व केंद्र सरकारकडून मंजूर झाल्या होत्या, मात्र मागच्या अडीच वर्षांत ही कामे मंजूर होऊ शकली नाही. या कामांनाही गती देणार असून याव्यतिरिक्त आणखी काही नव्या योजना वेगाने मंजूर करून आणून ती कामेही वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. भविष्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. जिल्हय़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांचीही या कामात मोठी मदत मिळेल असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. शहर विकास ही जादूची कांडी नाही, मात्र मागचा अनुभव आणि राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना याच्या जोरावर शक्य तेवढय़ा लवकर शहराचा लूक बदलण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले.
महापौरांची आजपासून दुसरी इनिंग
नवे महापौर संग्राम जगताप उद्यापासून (बुधवार) महापालिकेच्या नियमित कामकाजाला सुरुवात करणार आहेत. अपूर्ण योजना शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी या कामांना तातडीने गती देणार असल्याचे त्यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
First published on: 01-01-2014 at 02:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor second inning starting today