विधानसभा निवडणुकीचे रंग भरू लागले असताना भांडणात दंग असलेल्या ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची डोकेदुखी आणखी वाढण्याची चिन्हे असून आघाडीत सहभागी असूनही महापौर निवडणुकीत तटस्थ राहिल्यामुळे काँग्रेस पक्षाने मनसेच्या सात नगरसेवकांना नोटिसा धाडल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्यासाठी काँग्रेसचा हात हातात घेण्याची कृती मनसेच्या नगरसेवकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. आघाडीचा पक्षादेश झुगारल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने या नोटिसा पाठविल्या असून त्यामुळे मनसेपुढे नवा कायदेशीर तिढा ऊभा ठाकला आहे.
ठाणे महापालिकेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थापन केलेल्या लोकशाही आघाडीत मनसेचे सात नगरसेवक सहभागी झाले आहेत. कोकण विभागीय आयुक्तांकडे स्थापन करण्यात आलेल्या या आघाडीत सहभागी होत मनसेने यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीचा पट्टा गळ्यात अडकवून घेतला आहे. त्यामुळे आघाडीचा पक्षादेश बंधनकारक असल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने मनसेला ही नोटीस बजावली आहे. रवींद्र फाटक यांच्या बंडापूर्वी ठाणे महापालिकेत आघाडी आणि युती अशा दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान होते. त्यामुळे सात नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या मनसेची भूमिका महापालिकेतील सत्ताकारणात महत्त्वाची मानली जात होती. असे असताना कोकण आयुक्तांकडे स्थापन झालेल्या काँग्रेस आघाडीच्या गटात थेट सहभागी होण्याचा निर्णय घेत मनसेच्या स्थानिक नेत्यांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. कोकण आयुक्तांकडे स्थापन झालेल्या युतीच्या गटात भारतीय जनता पक्षाचे नऊ नगरसेवक थेट सहभागी झाले नाहीत. भाजपने आपल्या नगरसेवकांच्या स्वतंत्र गटाची नोंदणी केली. हा शहाणपणा मनसेला दाखविता आला नाही. त्यामुळे आघाडीच्या गटनेत्यांचा आदेश मनसेच्या नगरसेवकांनाही लागू होऊ लागला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या मनसेने आघाडीतून बाहेर पडण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असली तरी यासंबंधीच्या याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने तांत्रिकदृष्टय़ा मनसे अजूनही आघाडीत आहे.
काँग्रेसशी संग..मनसेत वातावरण तंग
विधानसभा निवडणुकीचे रंग भरू लागले असताना भांडणात दंग असलेल्या ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची डोकेदुखी आणखी वाढण्याची चिन्हे असून आघाडीत सहभागी असूनही महापौर निवडणुकीत तटस्थ राहिल्यामुळे काँग्रेस पक्षाने मनसेच्या सात नगरसेवकांना नोटिसा धाडल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-09-2014 at 11:34 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayoral election create dispute congress and mns in thane city