सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर कुठेही कचरा टाकणाऱ्यांना आता पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल! स्वच्छता निरीक्षकांनी तात्काळ दंड वसुलीची कारवाई सुरू करावी, असे आदेश महापौर प्रताप देशमुख यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’ची मासिक सभा महापौर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थायी समिती सभापती विजय जामकर, विरोधी नेते भगवान वाघमारे, सभापती रजीयाबेगम म. युनूस सरवर उपस्थित होत्या. बठकीत शहर स्वच्छतेच्या मुद्दय़ावरून महापौरांनी स्वच्छता निरीक्षकांना धारेवर धरले. शहरात कचरा उचलण्यासाठी १२ ट्रॅक्टर आहेत. तसेच २५ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. असे असताना शहरात सगळीकडे कचरा का, असा सवाल देशमुख यांनी केला. वाघमारे यांनीही स्वच्छता कर्मचारी प्रभागात येत नसल्याकडे लक्ष वेधले. नगरसेवक सुनील देशमुख, अॅड. जावेद कादरी, तिरुमला खिल्लारे, बाळासाहेब बुलबुले, मेहराज कुरेशी, विजय धरणे यांनीही आपापल्या प्रभागातील समस्या मांडल्या. व्यापारी, पानटपरी, हॉटेलधारक यांनी यापुढे घंटागाडीत कचरा टाकावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देशमुख यांनी दिले.
प्लॅस्टिक पिशव्यांच्या उत्पादकांवर, त्याची विक्री करणाऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारावा. प्लॅस्टिक पिशव्यांतून वस्तू विकल्यास पाचशे रुपये, प्लॅस्टिकचा कचरा जाळल्यास शंभर रुपये दंड आकारून गुन्हा नोंदवावा. मैलायुक्त पाणी निचरा करण्याबाबत तरतुदीचा भंग केल्यास दोन वेळा नोटीस बजावून दहा हजार रुपये दंड आकारा, सार्वजनिक रस्ते, गटारे यात डेब्रीजचे ढीग टाकल्यास दहा हजार रुपये दंड, फेरीवाले, भाजीपाला विक्रेते यांनी स्वतच्या कचरादाण्या न ठेवल्यास पाचशे रुपये दंड, भूखंडावर बांधकाम करणारे मालक व भोगवटादार यांनी कचरा साठवणुकीस राखीव क्षेत्र न ठेवल्यास पाच हजार रुपये दंड, सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्यास दहा हजार रुपये दंड लावण्याचे आदेशही देशमुख यांनी दिले.
बांधकाम साहित्य रस्त्यावर दिसल्यास स्वच्छता निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली. प्रभाग समिती प्रमुख महंमद इम्रान, नगरसचिव चंद्रकांत पवार, संगीता कलमे, आशा नरसीकर, नीता दुधगावकर, गोिवद पारटकर, अशोक पाटील, मीर शाकेर अली, सय्यद इम्रान आदी उपस्थित होते.