‘माणूस केलंत तुम्ही मला’ अशा आपल्या कवितेच्या ओळी म्हणून कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आपल्यावरील डीव्हीडी प्रकाशनानंतर भावना व्यक्त केल्या आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. पाडगावकरांची कविता, त्यांनी हाताळलेले विविध काव्य प्रकार, बोलगाणी, वात्रटिका याविषयी तसेच त्यांच्या पहिल्या कवितेपासून आतापर्यंत कवी म्हणून झालेला त्यांचा प्रवास, त्यांचे अनुभव याविषयी ज्येष्ठ निवेदक भाऊ मराठे यांनी संवाद साधून ‘माझे जीवनगाणे एक कविता चरित्र’ ही समग्र पाडगावकर डीव्हीडी तयार करण्यात आली आहे. अशा प्रकारे डीव्हीडीद्वारे कवीच्या कविता प्रवासाचे डिजीटल दस्तावेजीकरण करण्याचा पहिलाच प्रयत्न सांगलीच्या चैतन्य मल्टिमीडियाने केला आहे. त्या प्रसंगी पाडगावकर बोलत होते.
पाडगावकरांनी आतापर्यंत लिहिलेल्या कविता, गाणी, संगितिका याविषयी तसेच त्यामागच्या प्रेरणा, त्यांचा कवी म्हणून झालेला गेल्या सत्तर वर्षांच्या कालखंडातील प्रवास यावर समग्र प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘माझे जीवनगाणे एक कविता चरित्र’ या डीव्हीडीचे प्रकाशन रविवारी चैतन्य मल्टिमीडिया आणि कलाभारती या संस्थांच्या वतीने हृद्य सोहळ्यात करण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर प्रमुख पाहुणे म्हणून तर रामदास भटकळ, सतारवादक पं. शंकर अभ्यंकर, डॉ. वि. ना. श्रीखंडे, कर्नाटक संघाचे प्रकाश बुर्डे, चैतन्य मल्टिमीडियाचे डॉ. बाळकृष्ण चैतन्य, डीव्हीडी तयार करण्यात मोलाचा वाटा असलेले बंडोपंत सोहोनी, निवेदक भाऊ मराठे आदी उपस्थित           होते.
प्रकाशनापूर्वी भाऊ मराठे यांनी पाडगावकर यांची छोटेखानी मुलाखत घेतली. तसेच पाडगावकरांनी आपल्या अनेक कवितांचे दिलखुलास वाचन केले. भटकळ, अभ्यंकर, केतकर, श्रीखंडे आदी मान्यवरांनी वेगवेगळ्या वेळी पाडगावकरांशी झालेल्या भेटीगाठी आणि पाडगावकरांचा मिष्किलपणा याविषयी सांगितले.
या वेळी संगीतकार यशवंत देव, ज्येष्ठ कवी शंकर वैद्य, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांसारख्या पाडगावकरांच्या सुहृदांची वक्तव्ये असलेल्या या डीव्हीडीमधील काही क्षणचित्रे या वेळी दाखविण्यात  आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा