रेल्वेचा कणा असलेल्या गँगमनना रेल्वेने वाऱ्यावर सोडले असल्याचे उजेडात आले आहे. पण ही स्थिती फक्त गँगमनचीच नसून रेल्वेच्या यार्डामध्ये गाडय़ांची देखभाल करण्यासाठी खपणाऱ्या प्रत्येक कनिष्ठ कर्मचाऱ्याची आहे. मध्य रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणाऱ्या माझगाव येथील रेल्वे यार्डातील कर्मचाऱ्यांना किमान आवश्यक सेवांपासूनही वंचित राहावे लागत आहे. येण्या-जाण्यासाठी योग्य रस्ता, आपत्कालीन परिस्थितीत यार्डातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठीचा जोडरस्ता, कर्मचाऱ्यांना जेवण जेवण्यासाठी जागा, गाडीच्या महत्त्वाच्या भागांची दुरुस्ती करण्यासाठी उपलब्ध असलेली जागा या सर्वच आघाडय़ांवर कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून वारंवार आवाज उठवूनही रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणु नायर यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
माझगाव रेल्वे यार्डात जाण्यासाठी सँडहर्स्ट रोड स्थानकावर उतरावे लागते. या स्थानकावर भायखळ्याच्या दिशेने फलाटावर उतरून अप धीमी, डाउन जलद आणि अप जलद या तीन मार्गिका ओलांडाव्या लागतात. सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक वळणावर असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या गाडय़ांचा अंदाज येत नाही. परिणामी अनेकांचे बळी येथे जातात. मात्र रेल्वे प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना यार्डात जाण्यासाठी हार्बर मार्गावरील फलाटावरून जिने उपलब्ध करून दिले आहेत. हे जिने लांब असल्याने सँडहर्स्ट रोडच्या टोकाला एक पादचारी पुल उभारून कर्मचाऱ्यांची सोय करावी, अशी मागणी कर्मचारी करत आहेत.
माझगाव यार्डात जाण्यासाठी रस्त्याची सोय करण्यात आली नसून रेल्वे रूळांवरूनच चालत जावे लागते. पावसाळ्यात रूळांमध्ये भरमसाठ गवत वाढते. तसेच पाण्यामुळे खड्डे दिसेनासे होतात. या खड्डय़ांत पडून पाय मुरळगल्याच्या आणि फ्रॅक्चर झाल्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. रूळांच्या बाजूने केलेल्या सिमेंटच्या मार्गालाही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच या मार्गावर वीजेचे दिवे बसवले नसल्याने रात्रीच्या पाळीला यार्डात जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते.
मेल-एक्स्प्रेसची दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांना गाडीच्या खाली उभे राहावे लागते. मात्र गाडीच्या खाली कर्मचाऱ्यांना वाकूनच काम करावे लागते. एक माणूस आरामात उभा राहून काम करू शकेल, एवढी जागा येथे नाही. तसेच गाडीची चाके वगैरे तपासण्यासाठी गाडीच्या बाजूने चालत जाणे गरजेचे असते. मात्र गाडीच्या बाजूने एक माणूस चालेल एवढीही जागा नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाकून अडचणीत काम करावे लागते. माझगाव यार्डाजवळच असलेल्या वाडीबंदर यार्डात नव्याने कारशेड्स उभारली असून येथे मात्र रेल्वेखाली आणि रेल्वेच्या बाजूने वावरायला पुरेशी जागा आहे.
या यार्डात काम करणाऱ्या गँगमनसाठी एक कँटीनवजा खोपटे भायखळ्याजवळ उभारण्यात आले आहे. मात्र अनेकदा गँगमनना या एका टोकाला असलेल्या कँटिनमध्ये चालत येण्याइतकाही वेळ नसतो. अशा वेळी गँगमनसाठी राखून ठेवलेल्या खुराडय़ात वीस-तीस गँगमन एकत्र बसून जेवतात. अनेक गँगमन बाहेर बसूनच उन्हातान्हात पोटात अन्न ढकलतात. काम करताना थकवा आला, तर विसावा घेण्यासाठीही त्यांना जागा नाही. गँगमनसाठी म्हणून जे आसऱ्याचे ठिकाण उभारले आहे, ते अत्यंत अस्वच्छ आणि गटारालगत आहे. रेल्वेने मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची धुलाई करण्याचे कंत्राट खासगी कंत्राटदारांना दिले आहे. या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना गणवेश, सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम शिरस्राण, गमबूट आदी सर्व गोष्टी वेळच्या वेळी पुरवल्या जातात. गँगमन व रेल्वेच्या इतर कर्मचाऱ्यांना मात्र त्या वेळेत मिळत नसल्याचा आरोपही वेणु नायर यांनी केला आहे.
यार्डात कामाच्या ठिकाणी अपघात नेहमीच घडतात. मात्र एखाद्या कामगाराला गंभीर इजा झाली, तर त्याला तातडीने यार्डाबाहेर काढून रुग्णालयात नेण्याची सोय नाही. यार्डाला जोडलेला वाहनांसाठीचा रस्ता अस्तित्त्वातच नाही. रेल्वे कॉलनीच्या दिशेने असलेला रस्ता लोखंडी दरवाजा बसवून बंद करण्यात आला. त्यामुळे आता भायखळा पश्चिमेला असलेला रेल्वे कॉलनीतील रस्ता वापरावा लागतो. दुखापत झालेल्या कर्मचाऱ्याला त्या रस्त्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी चार रेल्वेमार्ग ओलांडावे लागतात. याठिकाणीही वळण असल्याने येणाऱ्या गाडय़ांचा अंदाज घेत पुढे जावे लागते. त्यामुळे जखमी कर्मचाऱ्याला वाचवता वाचवता दुसरीच दुर्घटना ओढवण्याची भीती असते.