वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने यंग स्टार्स संस्थेतर्फे १५ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘माझी वसई’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत भरविण्यात येणाऱ्या एका विशेष प्रदर्शनातून वसईतील ग्रामीण जीवन आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
वसईमध्ये विविध जाती-जमाती आणि अनेक धर्मीयांचे वर्षांनुवर्षे वास्तव्य आहे. यात आगरी, कोळी, वाडवळ, कुणबी, भंडारी, ख्रिश्चन, सामवेदी, कुपारी, आदिवासी, मुस्लीम, तेली, मांगेला, लोहार, पांचाळ, सुतार, कुंभार, चर्मकार, सोनार, खाटीक, ब्राह्मण, कुडाळी, गुजराती, मारवाडी, भरवाडी, केरळी आदींचा समावेश आहे.
या लोकांचे राहणीमान, जीवनमान, बोलीभाषा, व्यवसाय, चालीरीती, रूढी-परंपरा, व्रतवैकल्ये, सण-उत्सव, पेहराव, केशभूषा, अलंकार, भांडीकुंडी, खाद्यसंस्कृती या सगळ्याचा वेध प्रदर्शनातून घेण्यात येणार आहे. प्रदर्शनात या सर्व विषयांवरील देखावे, प्रसंग, बोलीभाषेतील संवाद, लग्न, मुंज, बारसे यासारखे धार्मिक विधी, त्या त्या भाषेतील गाणी, पारंपरिक पाककृती या सगळ्यांचा समावेश असणार आहे.

Story img Loader