सध्या पाण्याच्या मुद्यावर राजकारण करून अनेकांकडून मतांचा जोगवा मागण्यात येत आहे. मात्र ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाणच कमी आहे, तिथे प्रकल्प बांधणीच्या माध्यमातून आपण काय साध्य करणार? त्यापेक्षा सत्य परिस्थितीचा विचार करत यावर पर्याय शोधण्याकडे उमेदवार व सुजाण नागरिकांनी कल ठेवावा, असे आवाहन माकपचे दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार हेमंत वाघेरे यांनी केले. येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नामदार गोपाळकृष्ण गोखले वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागातफे आयोजित ‘राजकीय जनजागृती’ कार्यक्रमात ते बोलत होते. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून नार-पार वळण बंधाऱ्यांचा प्रश्न प्राधान्याने चर्चिला जातो. या मुद्यावरून माकपने संबंधितांवर टोलेबाजी केली.
मांजरपाडा प्रकल्प, नारपार प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचे आमिष दाखवत नागरिकांची मने वळविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, त्याचवेळी उमेदवार व नागरिकांना वस्तुस्थितीचे भान येणे गरजेचे आहे. प्रकल्पाला आमचा विरोध नाही असेही वाघेरे यांनी सांगितले. राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पातून पेठ सुरगाणा येथील नद्यांचे पाणी गुजरातला न जाता महाराष्ट्रात वळवावे, या भागातील नद्यांवर लघुबंधारे बांधुन हे पाणी येथे राखणे शक्य आहे. पण यावर कधीही ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आजवर निवडून आलेल्यांनी स्थानिकांसाठी काय कामे केलीत याची माहिती ना लोकप्रतिनिधींना, ना नागरीकांना अशी स्थिती आहे. सभामंडप, ही यांची विकासकामे अशा शब्दात त्यांनी विरोधकांची खिल्ली उडविली. नाशिक मतदार संघातून निवडणूक लढविणारे तानाजी जायभावे यांनी ‘इंडिया बुल्स’ प्रश्नाबद्दल माकपने घेतलेली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांची सेझच्या नावाखाली लूट होत असताना शासनाकडून प्रती एकरी १७ लाख रुपये इतका भाव मिळवून देत आंदोलन यशस्वी केले. रस्त्यांच्या विस्तारीकरणात टोल लावून सर्वसामान्यांची लूट होते. नाशिक-त्र्यंबक रस्त्याच्या याच पध्दतीने होणाऱ्या चौपदरीकरणास विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला. निवडणुकीत विजयी झाल्यास पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, द्राक्ष, टोमॅटो, कांदा अशा शेतीवर आधारीत उद्योग नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीधर देशपांडे यांनी समाजातील विषमतेकडे लक्ष वेधले. महिलांचे संरक्षण, पायाभुत सुविधा त्यातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, विभागप्रमुख प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा