महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्माच्या माध्यमातून समाजात नैतिक बांधिलकीची चळवळ उभी केली. आज दुर्दैवाने सर्वधर्माची नव्हेतर सर्व प्रकारच्या चळवळीत नैतिकतेची उणीव आढळून येत असल्याची खंत व्यक्त करताना, थेट परकीय गुंतवणूक हा ज्वालामुखीच असून, त्यावर आपण सर्वजण बोललो आहोत. त्याचा धोका ओळखला नाहीतर अनर्थ घडेल. अशी भीती ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कॉम्रेड प्रा. अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केली. काळय़ा पैशाविरोधी चळवळीला लोकांनी नैतिक शक्ती देणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.
सातारच्या संबोधी प्रतिष्ठानतर्फे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत ‘एफडीआय व काळय़ा पैशाची समस्या’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार गोविंद देशपांडे, प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील, पद्मा कदम, रमेश इंजे, कॉम्रेड वसंतराव नलावडे, मिलिंद मनोहर, रघुवीर आपटे यांची या वेळी उपस्थिती होती.
प्रा. अभ्यंकर म्हणाले, की थेट परदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ५० टक्के वाटा सट्टेबाजारास होणार आहे. त्यामुळे फायनान्स मार्केट कोसळून अराजक माजल्याशिवाय राहणार नाही. किरकोळ व्यापारातील विदेशी गुंतवणुकीमुळे व्यापारी दलाल कमी होतील. पण त्याचा फायदा शेतकऱ्यास होणार असल्याचे म्हणणे पुरते चुकीचे आहे. परदेशी थेट गुंतवणुकीच्या धोरणात नवीन रोजगारनिर्मितीची सुतराम शक्यता नाही. देशाला हानिकारक नसलेल्या परदेशी गुंतवणुकीस माकपचा बिलकुल विरोध नाही. मात्र, त्याबाबत विनाकारण गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाला भेडसावणाऱ्या सार्वत्रिक प्रश्नांचे निवारण लोकांनी आपल्या नैतिक शक्तीसह चळवळीत सहभाग वाढविला तरच होऊ शकते. देशाचे सार्वभौमत्व, नवीन रोजगारनिर्मिती, सर्वसामन्य जनतेला अन्न, वस्त्र व निवारा याची खात्री देणारे धोरण अवलंबविले पाहिजे अशी भूमिका प्रा. अभ्यंकर यांनी मांडली.
प्रतिष्ठानचे कार्यवाह रमेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विश्वस्त केशवराव कदम यांनी आभार मानले. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह सातारकरांची या वेळी उपस्थिती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा