सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी यंदा ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘सेलिब्रेशन पाटर्य़ावर’ मुंबईतील उपनगरांत मुंबई पोलिसांचे तसेच ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहर परिसरात ठाणे पोलिसांचेही विशेष लक्ष असणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेल्या ‘म्याव म्याव’ म्हणजेच ‘एमडी’ या नशेच्या पावडरचा या पाटर्य़ामध्ये पुरवठा होतो आहे का, याकडे पोलिसांच्या विशेष पथकाचे लक्ष राहणार आहे. नववर्षांचे स्वागत करताना काही बडय़ा धेंडांच्या पाटर्य़ामध्ये एमडीची चलती राहील, असा पोलिसांना संशय असून त्यामुळेच ही पथके स्थापन करण्यात आली आहेत.
मुंबईतील उपनगरांसह नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर या प्रमुख तसेच आसपासच्या शहरांमध्ये नववर्षांच्या स्वागतासाठी मोठय़ा प्रमाणात पाटर्य़ाचे आयोजन करण्यात येते. हॉटेल, फार्म हाउस, इमारतीची गच्ची किंवा निसर्गरम्य वातावरणात अशा पाटर्य़ा साजऱ्या होत असून त्या अगदी पहाटेपर्यंत रंगतात. मांसाहारावर ताव मारणे, मद्याच्या बाटल्या रिचवणे असे पाटर्य़ाचे स्वरूप असते. काही पाटर्य़ामध्ये चरस, गांजा यासारख्या अमली पदार्थाची रेलचेल असते. यापुर्वी पोलिसांच्या अनेक कारवायांतून हे समोर आले आहे. यंदाही ठाणे पोलिसांनी ‘सेलिब्रेशन पाटर्य़ावर’ लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा हाती घेतल्या असून त्यासाठी विशेष पथके तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेऊन अशा पाटर्य़ावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गैरप्रकारांवर कारवाई करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पोीलस सूत्रांनी दिली. मुूंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानेही मुंबईतील उपनगरांमधील काही ठिकाणी याकडे आपले विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
एमडीवर विशेष वॉच..
ठाणे, मुंब्रा आणि कल्याण या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोकेनसारखी दिसणारी ‘एमडी’ या नशेच्या पावडर विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू असून अनेक विद्यार्थी तसेच तरुण या नशेच्या आहारी गेल्याचे उघड होऊ लागले आहे. सुरुवातीला ही पावडर मोफत देऊन अनेकांना या नशेचे व्यसन लावण्यात येत असल्याचे तपासातून पुढे आले आहे. सेलिब्रेशन पाटर्य़ाच्या माध्यमातून अनेकजण नवीन नशेचे सेवन करत असतात. त्यामुळे सध्या बहुचर्चित असलेल्या ‘एमडी’ पावडरचा पाटर्य़ामध्ये मोठय़ा प्रमाणात वापर होऊ शकतो. याशिवाय पाटर्य़ाच्या माध्यमातून अनेकांना या व्यसनाच्या आहारी ओढले जाऊ शकते, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या पाटर्य़ामध्ये ‘एमडी’ या नशेच्या पावडरचा पुरवठा होतो का, याकडे ठाणे अमलीविरोधी पथकाचे विशेष लक्ष राहणार असून त्यांच्यामार्फत अशा पुरवठादारांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सुरक्षेची उपाययोजना..
यंदाही सेलिब्रेशन पाटर्य़ाच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमार्फत वॉच ठेवण्यात येणार आहे. पाटर्य़ामध्ये महिलांची छेडछाड होऊ नये, यासाठी महिलांचे विशेष पथक गस्त घालणार आहेत. हॉटेल, फार्म हाउस, येऊर अशा महत्त्वाच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. याशिवाय, वाहतूक शाखेमार्फत श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्या अधिकाऱ्याने दिली.
नववर्ष पाटर्य़ाना एमडीची भुरळ
सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी यंदा ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये आयोजित करण्यात
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-12-2014 at 06:24 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Md in new year parties