काँग्रेस सरकारने मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार करून पाप केले आहे. आता जनलोकपाल विधेयक मंजूर करून त्यांनी जनतेचे पुण्य पदरात पाडून घ्यावे असे मत पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. राळेगणसिद्धी येथे गुरुवारी सकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर श्रीमती पाटकर पत्रकारांशी बोलत होत्या.
श्रीमती पाटकर म्हणाल्या, की अण्णांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. त्यांच्याच तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार वेळकाढूपणा करते आहे. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यात विरोधकही कमी पडत असल्याचे सांगत भ्रष्टाचाराच्या पापातून मुक्त हेाण्यासाठी काँग्रेस सरकारने जनलोकपाल विधेयक मंजूर करावे असेही श्रीमती पाटकर म्हणाल्या. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेविषयी बोलताना पाटकर म्हणाल्या, की आमची सामाजिक भूमिका वेगळी आहे, केजरीवालांची वेगळी आहे. मात्र त्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे गैर नाही. कोणत्याही आंदोलनाला अप्रत्यक्ष राजकीय रंग असतोच असे सांगत त्यांनी हजारे यांच्या भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न केला.
पाटकर या बुधवारी रात्री रेल्वेने नगरमध्ये पोहचल्या. तेथून रात्री एकच्या सुमारास त्यांनी राळेगणसिद्घी येथे येऊन मुक्काम केला. सकाळी नऊ वाजता त्यांनी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. तेथून त्या पुण्याकडे रवाना झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा