समाजामध्ये घडलेल्या विविध घटना मांडताना त्यांचा समाज मनावर विपरित परिणाम होणार नाही, याची दक्षता प्रसार माध्यमांनी घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नागपूर महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांनी केले.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘माध्यमांचे स्वातंत्र्य’ या विषयावर टिळक पत्रकार भवनात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक भि.म. कौसल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हिंदूस्थान टाइम्सचे ब्युरो चीफ प्रदीप मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, सरचिटणीस ब्रम्हाशंकर त्रिपाठी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.
माध्यमाचे स्वातंत्र्य र्निबधित असावे असा मतप्रवाह असल्याचे नमूद करून वर्धने म्हणाले, समाजकारण, राजकारण आणि प्रशासन यातील चुका जनतेच्या लक्षात आणून देताना माध्यमांवर निर्बंध नाहीत. यातील कोणती गोष्ट समाजासमोर मांडायची त्याचे तारतम्य ठेवणे आवश्यक आहे.
माध्यमांमुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही याची जाण ठेवणे आवश्यक आहे. सध्या मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात स्पर्धा वाढली आहे. केवळ माझी बातमी अगोदर प्रसारित होईल यासाठी चढाओढ असते.
शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता  असते. समाज एकसंघ राहील यासाठी माध्यमांनी स्वत:वर निर्बंध घालणे आवश्यक आहे. माहिती संचालक भि.म. कौसल यांनी विचार स्वातंत्र्यामुळे जगात लोकशाही रुजण्यात मदत झाल्याचे सांगितले. एखादी घटना सत्य असेल, पण ती अप्रिय असेल आणि त्या घटनेमुळे समाजात अशांतता निर्माण होणार असेल तर माध्यमांनी स्वातंत्र्यासोबत जबाबदारीचे भानही ठेवावे, असे सांगितले.
माध्यमांनी विश्वसनियता टिकवली तरच माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहील, असे पत्रकार राहुल पांडे यांनी सांगितले.  प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची उपयोगिता आणि तिसऱ्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची आवश्यकता असल्याचे शिरीष बोरकर यांनी सांगितले.
माध्यमांनी वाचकांना शिक्षित करण्याची वेळ आली आहे. वृत्तपत्र कोणी काढावे, कोणी लिहावे किंवा इलेट्रॉनिक्स माध्यम कोणी चालवावे, याविषयी आचारसंहिता असावी, असे प्रदीप मैत्र म्हणाले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा