देश आज संक्रमण अवस्थेतून जात आहे. आणखी १५ ते २० वर्षे अशी स्थिती राहील. या काळात विचारांचे मोठे महत्त्व असल्याने प्रसार माध्यमे आणि बुद्धिजीवींनी वैज्ञानिक विचारांचा प्रसार करून जातीयवाद, धार्मिक कट्टरतावाद  आणि अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करावा, धर्मनिरपेक्षतेसाठी सर्व नागरिकांना समान सन्मान मिळावा, असे प्रतिपादन प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्या. मरकडेय काटजू यांनी केले.
‘धर्मनिरपेक्षतेच्या पुरस्कारात प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात न्या. काटजू बोलत होते. देशात गरिबी, महागाई, भाववाढ, शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा अशा भीषण समस्या निर्माण झालेल्या असून मोठय़ा घडामोडी घडत आहेत. या देशात आदिवासी हेच मूळ निवासी असून जवळपास ८० टक्के लोक बाहेरून आलेले आहेत. अधिक पूर्वज हे उत्तर-पूर्व भागातून आले आहेत. आधी कृषीप्रधान व्यवस्था होती. पाणी, नद्या, जमीन आणि संपन्नता असल्याने आपला देश स्वर्ग होता. देशात विविध जाती, धर्म,  संस्कृती विभन्न असल्याने विविधता आहे. म्हणून सर्वाना समान सन्मान मिळायला हवा आणि धोरण धर्मनिरपेक्ष असावे, हाच देश चालविण्याचा खरा मूलमंत्र आहे. असे धोरण थोर बादशहा अकबर यांनी तयार केले होते. त्यांना आपल्यापेक्षा दोनशेपट अधिक दूरदृष्टी होती. सर्व धर्माचा सन्मान राखण्याचे धोरण त्यांनी राबविले होते. सर्वधर्मसमभाव ही अकबरांची देणगी आहे. तेच धोरण आजही महत्त्वाचे असून त्याच आधारावर देश वाटचाल करीत आहे, असे न्या. काटजू म्हणाले.
आपसातील भांडणामुळे गणतंत्राला धोका निर्माण होऊ शकतो. लोकांमध्ये प्रेमभावना कायम आहे, तोपर्यंत गणतंत्राला कोणीही धक्का लावू शकत नाही. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली तरी देशात सर्व धर्माच्या लोकांना समान सन्मान मिळावा. आपल्या देश आज मोठय़ा कठीण परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. ही स्थिती पुढील १५ ते २० वर्षांपर्यंत राहू शकते. अशा काळात विचारांना फार महत्त्व आहे. वैज्ञानिक विचारांचा प्रसार करणे, धार्मिक कट्टरवाद व अंधश्रध्दांवर प्रहार करणे हेच पत्रकारांचे कर्तव्य आहे. देशाला आधुनिक, औद्योगिक बनवा, असे आवाहन न्या. काटजू यांनी केले.
ज्योतिषशास्त्रावर त्यांनी कडाडून टीका केली. ज्योतिष हे थोतांड आहे. आपण किती मागासलेले आहोत, असेच यातून ध्वनित होते. यासाठी प्रसार माध्यमांनी अंधश्रद्धेवर प्रहार करावे, वैज्ञानिक विचारांना चालना द्यावी, प्रत्येक धर्मात ९९ टक्के लोक चांगले तर १ टक्का वाईट प्रवृत्तीचे आहेत. भारत हा मूळ हिंदूंचा देश नाही. हिंदू, मुस्लिम,  शीख, पारशी या सर्वाचाच हा देश आहे. या देशात हिंदू हेच प्रथम श्रेणीचे नागरिक नसून सर्व धर्माचे नागरिक प्रथमश्रेणीचे नागरिक आहेत. आधुनिक उद्योगांची आज गरज आहे. फुटीरतेने मोठे नुकसान होणार असल्याने सर्वाना एकजूट होऊन राहायचे आहे.  इस्लामिक राष्ट्र बनलेल्या पाकिस्तानाची अवस्था आज एका मनोरुग्णलयासारखी झाली आहे.
भारतात असे होऊ नये असे वाटत असेल तर धार्मिक कट्टरतावादाला थारा देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. या आधी न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने शहरात आलेले न्या. काटजू यांचे जाहीर व्याख्यान प्रथमच झाले. व्याख्यानाला श्रोत्यांनी गर्दी केली होती.

Story img Loader