पुरुषोत्तम कढव यांचा मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेला असून पुन्हा या प्रकारची घटना कोणत्याही रुग्णासोबत घडू नये त्यादृष्टीने भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने नगरसेवक संदीप जोशी व किशोर वानखेडे यांच्या नेतृत्वात मेडिकल गेट क्रमांक २ येथे दिवं. पुरुषोत्तम कडव स्मृती अस्थायी मेडिकल तक्रार निवारण केंद्राचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, नगरसेवक रमेश शिंगारे, उल्हास यादव, कल्पना पांडे, प्रवीण दटके, देवेन दस्तुरे उपस्थित होते.
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध भागातून प्रांतातून रुग्ण दाखल होतात, पण त्यांना मात्र आवश्यक असलेल्या सेवा डॉक्टरांमार्फत पुरविण्यात येत नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागते. डॉक्टरांची माणुसकी हरवत चालली असल्याची टीका फडणवीस यांनी यावेळी केली. शासनाकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमाने मेडिकलच्या समस्या मांडण्यात आल्यात आणि त्यासाठी शासनामार्फत निधी देखील देण्यात आला. परंतु निधीचे योग्य व्यवस्थापन केले नसून आजपर्यंत मेडिकलच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल टेंडर गेल्या ४ वर्षांत प्रशासनाच्या वतीने न काढणे संतापजनक बाब आहे.  १५ एप्रिलपर्यंत हे केंद्र कार्यरत राहणार आहे. आवश्यकता वाटल्यास केंद्राला स्थायी स्वरूप देण्यात येणार येईल.
दुय्यम स्थान मिळाले कढव कुटुंबीयांना
दिवं. पुरुषोत्तम कडव तक्रार निवारण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते. परंतु ज्या व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले होते आणि ज्यांनी आपला सदस्य गमावला अशा दिवं. पुरुषोत्तम कडव कुटुंबातील सदस्यांना मंचावर बोलाविण्याचे सामंजस्य दाखविले नाही. याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अखेर चूक लक्षात आल्यावर ती सुधारण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा