शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अधिष्ठात्यांना सध्या २० लाख रुपये किमतीचे साहित्य खरेदी करण्याचे अधिकार असून ते ५० लाख रुपयांपर्यंत वाढविले जातील, तसेच रुग्णांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी एक र्सवकष धोरण ठरवण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
मेडिकलमधील क्ष-किरण विभागात मार्च २०१४ मध्ये एक्स-रे फिल्मचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णांना एक्स-रे बाहेरून काढून आणण्यास सांगण्यात येत होते. या कारणामुळे त्यांच्यावर आर्थिक भरूदड पडत होता, ही बाब आमदार अनिल सोले, नागो गाणार यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केली होती. या प्रश्नाच्या उत्तरात तावडे म्हणाले, पुरवठादारांची काही रक्कम बाकी राहिल्याने त्यांनी एक्स-रे फिल्मचा पुरवठा बंद केला होता. त्यामुळे या कालावधीत एक्स-रे फिल्मचा तुटवडा निर्माण झाला होता. नंतर मात्र पुरवठादारांनी पुरवठा केल्याने तुटवडा दूर झाला. सध्या एक्स-रे फिल्मचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. परंतु अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शासन एक सवर्ंकष योजना राबवण्याचा विचार करीत आहेत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
जेथे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहेत, त्यांच्यात समन्वय दिसून येत नाही. तसेच मेडिकलमध्ये एक्स-रे शून्यावर येईपर्यंत वाट का बघावी लागली, असा प्रश्न हेमंत टकले यांनी उपस्थित केला. या प्रश्नाच्या उत्तरात तावडे म्हणाले, वैद्यकीय अधिष्ठात्यांना फक्त २० लाखांपर्यंतचे आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे यापेक्षा जास्त रकमेची खरेदी करावयाची असेल तर वैद्यकीय संचालक किंवा सचिवांची परवानगी घ्यावी लागते. यात बराच वेळ निघून जातो. ही स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अधिष्ठात्यांना ५० लाख रु. किमतीचे साहित्य खरेदी करण्याचे अधिकार दिले जाईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय, सिटी स्कॅन व एक्स-रे काढण्यासाठी ठरवून दिल्यापेक्षा अधिकची रक्कम घेत असल्याचे आढळून आल्यास, तेथील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तावडे यांनी प्रकाश गजभिये यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. मेडिकलच्या अधिष्ठात्यांची मार्च २०१५पूर्वी कायम नियुक्ती करण्यात येईल. एकंदरीत शासकीय रुग्णालयात रुग्णांना योग्य आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा